
मुंबई | Mumbai
महाराष्ट्रातील (Maharashtra) ऐतिहासिक गड किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) शौर्याच्या पराक्रमाचे साक्षीदार आहेत. त्यामुळे इतिहासाच्या (History) पाऊलखुणा शोधण्यासाठी अनेकजण या गड किल्ल्यांना भेटी देतात...
या गड किल्ल्यांना भेट देणारे काही समाजकंटक याठिकाणी मद्यप्राशन (Alcohol) करुन धिंगाणा घालतात. त्यामुळे शिवप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जाते. मात्र, आता या समाजकंटकांना आळा घालण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) मोठा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार आता गड-किल्ल्यांवर (Fort) मद्यपान करणाऱ्यास तीन महिने शिक्षा आणि दहा हजारांचा दंड आकारण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला आहे. तसेच असा प्रकार निदर्शनास आणून देणाऱ्याला ५० टक्के बक्षिस म्हणून देता येईल का, यासंदर्भात विधी व न्याय विभागाला मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येईल अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली. याशिवाय गड-किल्ल्यांवर हेरिटेज मार्शल देखील नेमण्यात येणार असल्याचे मुनगंटीवारांनी सांगितले.
दरम्यान, यापूर्वी राज्य सरकारने २०२० मध्ये असा निर्णय जाहीर केला होता. त्यावेळी गड-किल्ल्यांचे पावित्र्य राखण्यासाठी राज्य सरकारने (State Government) गड-किल्ल्यांवर मद्यपान बंदी लागू करण्याचे आदेश दिले होते. तसेच किल्ल्यांवर मद्यपान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देखील गृहमंत्रालयाकडून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आले होते.