Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याओबीसी मोर्चे थांबणार; राज्य सरकारकडून आरक्षणावर स्पष्टीकरण

ओबीसी मोर्चे थांबणार; राज्य सरकारकडून आरक्षणावर स्पष्टीकरण

मुंबई / नाशिक | प्रतिनिधी

ओबीसी आरक्षण कायम राहावे याबाबत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्यभरातील आंदोलनांची दखल घेऊन मराठा समाजाला आरक्षण देतांना ओबीसीसह कुठल्याही आरक्षणाला धक्का लावण्यात येणार नाही अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षाने हिवाळी अधिवेशनात भूमिका स्पष्ट केली आहे.

- Advertisement -

त्यामुळे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री पवार आणि विरोधी पक्षाचे आभार मानण्यात आले आहेत.

समता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढील नियोजित मोर्चे रद्द करून केवळ ओबीसी आरक्षणासाठी शासनाने निष्णात वकील देणे आणि महाज्योती, शिष्यवृत्तीसह इतर मागण्याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, कार्याध्यक्ष बापू भुजबळ, शिवाजीराव नलावडे, बाळासाहेब कर्डक, अॅड. सुभाष राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये आवाहन केले आहे.

मराठा आरक्षणाबाबत काही याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये ओबीसी आरक्षण रद्द करण्याबाबत भूमिका घेतली होती. त्यामुळे या विरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण देतांना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावण्यात येऊ नये याबाबत राज्यभर रस्त्यावरचे मोर्चे व आंदोलने करून आपली भूमिका शासनाकडे मांडली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षाने मराठा आरक्षण देतांना ओबीसींसह कुठल्याही आरक्षणाला धक्का लावण्यात येणार नाही अशी भूमिका स्पष्ट केली आहे.

या निर्णयाचे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने स्वागत करण्यात येत असून राज्य शासनाचे आभार मानले आहे.

राज्य शासनाने आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली असल्याने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने विविध जिल्ह्यात नियोजित असलेले मोर्चे व रस्त्यावरचे आंदोलने थांबिवण्यात यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

केवळ ओबीसी आरक्षणासाठी शासनाने निष्णात वकील देणे आणि महाज्योती, शिष्यवृत्ती यासह इतर मागण्याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात यावे असे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या