Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याLive Updates : बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्यानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या...

Live Updates : बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्यानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत, तामिळनाडूमधील जल्लाकट्टू आणि कर्नाटकातील कम्बाला या खेळांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. डिसेंबर महिन्यात यासंदर्भातील सुनावणी पूर्ण झाली होती. तेव्हा याबाबतचा निकाल राखून ठेवला होता. अखेर आज यासंदर्भातला निकाल न्यायालयाने दिला असून त्यानुसार महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती, तामिळनाडूमधील जल्लीकट्टू आणि कर्नाटकमधील कम्बाला या खेळांना परवानगी दिली आहे.

- Advertisement -

याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी अखेर कायमची उठवली. यामुळे बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. बैलगाडा शर्यत हा क्रीडाप्रकार ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा आहे. याखेरीज खिल्लार या देशी गोवंशाची यामुळे जपणूक होणार आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीची जपणूक होणार आहे. या निर्णयाबद्दल सुप्रीम कोर्टाचे मनापासून आभार”, असे ट्वीट त्यांनी केले आहे.

तोकडे कपडे घालणाऱ्यांना तुळजाभवानी मंदिरात ‘नो एन्ट्री’

तुळजापूर | Tuljapur

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरात वेस्टर्न कपडे (Western Dress) घालणाऱ्यांना यापुढे प्रवेश बंदी असणार आहे. आई तुळजाभवानी मंदिरात यापुढे हाफ पॅन्ट, बर्मुडा असे वेस्टर्न कपडे घालणाऱ्या भाविकांना बंदी घालण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थांचेवतीने अशा सूचनांचे फलक मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत….

अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य किंवा अश्लील वस्त्रधारी तसंच हाफ पॅन्ट बर्मुडा धारकांना मंदिरात प्रवेश नाही असा उल्लेख या सूचना फलकावर करण्यात आला आहे. कृपया भारतीय संस्कृती (Indian Culture) आणि सभ्यतेचे भान ठेवा अशी विनंती ही या फलकाद्वारे मंदिर संस्थांच्या वतीने भाविकांना करण्यात आली आहे.

मंदिराच्या परिसरात महिलांना वन पीस, शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट पॅन्ट घालून मंदिरात प्रवेश करता येणार नाही. फक्त महिलांना नाही तर पुरूषांना देखील शॉर्ट पॅन्ट घालता येणार नाहीड आहे. ड्रेसकोडबाबत मंदिराने कडक नियम घालून दिले आहेत. केवळ महिलाच नाही तर पुरुषांसाठी विविध नियम आहेत.

पेट्रोल पंपचालकाची भर दुपारी हत्या

नागपूर | Nagpur

येथील भिवापूर ते नागभीड रोडवर असलेल्या पाटील पेट्रोल पंपावर तिघांनी पंपचालकाचा चाकूने हल्ला करून खून केला. तसेच लुटमारदेखील केली आहे. दिलीप राजेश्वर सोनटक्के (रा. दिघोरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

भिवापूर ते नागभीड रोडवर दिलीप सोनटक्के यांचे पाटील पेट्रोल पंप आहे. बुधवारी सकाळी १० वाजता दिलीप हे कार्यालयात इंधनविक्रीचे पैसे मोजत होते. दरम्यान, दुचाकीवरून तीन युवक आले. त्यांनी दिलीप यांना पिस्तूल दाखवली आणि १ लाख ३४ हजार रुपये हिसकले. दिलीप यांनी प्रतिकार केला असता संशयितांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला.

कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली असता त्यांनाही ठार मारण्याची धमकी दिली. तीनही संशयितांनी दुचाकीने उमरेडच्या दिशेने पळ काढला.

याप्रकरणी शेख अफरोज (ताजबाग), मोहम्मद वसीम सोनू (२७, खरबी) आणि शेख जुबेर (मोठा ताजबाग) यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

भाजपात 2024 पर्यंत मोठे नेते येतील : चंद्रशेखर बावनकुळे

पुणे | Pune

भाजपात 2024 पर्यंत मोठे नेते येतील. राज्यात ब्लास्ट झालेले दिसतील. खूप मोठी नाव समोर येतील. कसब्याचा बदला आम्ही काढणार आहोत, 30 तारखेपर्यंत पुणे भाजपात मोठे बदल होतील, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठ्या भरतीचे संकेत दिले आहे.

पुण्यात आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी ते म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही 2024 मध्ये राज्यात चांगला विजय मिळवू. मोदींच्या नेतृत्वात आम्ही 2024 मध्ये देशात सरकारं आणू. राज्यभर ३५ लाख कार्यकर्ते काम करतील.

भाजपा कागदावर कधीचं बोलत नाही 3 विरुद्ध एकची लढाई होती म्हणून आम्ही कसबा हरलो. पण आता युती म्हणून आम्ही तयार आहोत. राज्यात आमच सरकारं काम करत आहे. जनता भुलथापला बळी पडणार नाही. जनतेचा फडणवीस अणि शिंदे यांच्यावर विश्वास आहे.

आम्ही आमचे प्रयत्न करत आहोत. कसब्याचा बदला आम्ही काढणार आहोत, 30 तारखेपर्यंत पुणे भाजपात मोठे बदल होतील, असे संकेतही बावनकुळेंनी दिले.

मालगाडीचे दोन वॅगन रुळावरून घसरल

नागपूर | Nagpur

रासायनिक खते घेऊन जाणाऱ्या मालगाडीचे दोन वॅगन नागपुरातील कळमना रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर रुळावरून घसरले. मालगाडी रुळावरून घसरल्याचे कळताच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

अपघात बचाव पथक (एआरटी) घटनास्थळी पाठवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. ४० वॅगन असलेली ही मालगाडी नागपूरमार्गे खंडवाकडे निघाली होती. कळमना रेल्वे स्थानकापासून काही अंतरावरील ‘कॉर्ड लाईन’वरून बुधवारी रात्री ही गाडी हावडा मार्गावर जाणार होती.

मात्र, मुख्य मार्गावर पोहोचताच दोन वॅगन रुळावरून घसरल्या. दोन वॅगन गाडीपासून वेगळ्या करण्यात आल्या आणि गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.

कायदेमंत्रीपदावरून किरेन रिजिजू यांना हटवले; आता ‘या’ नेत्याकडे कार्यभार

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

मोदी सरकारने मंत्रिमंडळ रचनेत मोठा बदल केला आहे. किरेन रिजिजू यांना केंद्रीय कायदेमंत्रीपदावरून हटवण्यात आले असून आता त्यांच्याकडे पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे….

कायदेमंत्रीपदावर रिजिजू यांच्या जागेवर भाजप नेते अर्जून राम मेघवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जुलै २०२१ मध्ये रवीशंकर प्रसाद यांच्या जागेवर किरेन रिजिजू यांची केंद्रीय कायदेमंत्री म्हणून नियुक्ती झाली होती.

नाशकात शनिवारी पाणीपुरवठा नाही

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मनपाचे मुकणे धरण रॉ वॉटर पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीचे रेमंड सबस्टेशन गोंदे येथून ३३ के. की वीजपुरवठा घेण्यात आलेला आहे. हे सबस्टेशन मधील विद्युत विषयक कामे करण्याकरीता विज वितरण कंपनीमार्फत शनिवार (दि. २०) तेथील वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मनपाचे विल्होळी जलशुध्दीकरण केंद्र येथून होणारा पाणीपुरवठा करता येणे शक्य होणार नाही.

तसेच मनपाचे गंगापूर धरण पंपींग स्टेशन येथून मनपाचे शिवाजीनगर, बाराबंगला, पंचवटी, निलगीरीबाग, गांधीनगर, नाशिक रोड या जलशुध्दीकरण केंद्रास पाणीपुरवठा करण्यात येतो. सदरचे जलशुध्दीकरण केंद्र व जलकुंभ व वितरण व्यवस्थेतील आवश्यक दुरुस्तीची कामे करणे गरजेचे असल्याने गंगापूर धरण पंपींग स्टेशन येथून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. दोन्हीही ठिकाणाहून होणारा पाणीपुरवठा शनिवारी (दि. २०) बंद ठेवून दोन्ही ठिकाणची दुरुस्ती केली जाणार आहे.

त्यामुळे संपूर्ण शहरास होणारा पाणीपुरवठा शनिवार (दि. २०) होणार नाही. तसेच रविवारी (दि.२१) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मनपाचे अधीक्षक अभियंता (यांत्रिकी) शिवाजी चव्हाणके यांनी केली आहे.

महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या तसेच राजकीय, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी पेज रिफ्रेश करा…

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; तिघांचा मृत्यू

नागपूर | Nagpur

नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील चाकडोह गावाजवळून शिवा गावाकडे जाणाऱ्या वळणार मागून भरधाव आलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन महिलांसह दुचाकीचालक युवक ठार झाला.

हा अपघात बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता कोंढाळीजवळ घडला. रोशन निळकंठ सहारे (२५), सुषमा उमेश वाघाडे (२८) आणि प्रतीक्षा राजेंद्र वाघाडे (२२) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या