
मुंबई | Mumbai
शिवसेना आमदार अपात्रेतबाबत (Shivsena MLA Disqualification) मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदाराची दररोज प्रत्येक आमदाराची प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) हे प्रत्यक्ष सुनावणी घेणार आहेत. या प्रकरणी ठाकरे गटाच्या १४ आमदारांनी या पुर्वीच लेखी उत्तरं सादर केली आहेत.
दरम्यान आता या प्रकरणी पुढच्या आठवड्यापासून आमदारांच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होणार आहे. ठाकरे गटाच्या १४ आमदारांपासून सुनावणीला सुरुवात होईल, अशी माहिती मिळत आहे. दररोज एका आमदाराची सुनावणी होणार आहे, अशी देखील माहिती समोर आली आहे.
विधानसभा राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना नोटीस बजावली होती. या नोटीसमध्ये दोन्ही गटाच्या आमदारांना म्हणणे मांडण्यासाठी कालावधी देण्यात आला होता. तसेच ठराविक कालावधीत आपले उत्तर सादर करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांकडून देण्यात आले होते. त्यानंतर ठाकरे गटाच्या आमदारांकडून राहुल नार्वेकर यांच्या नोटीसला उत्तर सादर करण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना आमदारांवरील अपात्रतेची कारवाई पुन्हा वेग घेणार असून शिवसेनेच्या दोन्ही गटातील आमदारांची सुनावणी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. याआधी विधानसभा अध्यक्षांनी २ आठवड्यांची मुदत दिली होती. त्यामुळे पुढील आठवड्यात शिंदे गटातील आमदारांची म्हणणे मांडण्याची मुदत संपणार आहे.
ठाकरे गटाच्या आमदारांनी आपले उत्तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सादर केले असल्याने आता त्यांची आधी सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष प्रत्येक आमदाराचे म्हणणे ऐकून घेणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्यानुसार, दररोज एका आमदाराचे म्हणणे राहुल नार्वेकर ऐकून घेणार आहेत.तर दुसरीकडे या दरम्यानच्या काळात शिंदे गटाकडून आपले लेखी म्हणणे विधानसभा अध्यक्षांकडे मांडले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्यांचीदेखील प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे.