रेल्वे मार्ग भूसंपादनासाठी महारेलचे जिल्हा प्रशासनाला ‘हे’निर्देश

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक – पुणे रेल्वे मार्गासाठी जमिनींची खरेदी सुरू झाली असताना जिल्ह्यात 17 पैकी 11 गावांमध्ये डिमार्केशन बदलावे लागणार असल्याचे महारेलने जिल्हा प्रशासनाला कळविले आहे. त्यामुळे संपादीत करावयाच्या जमिनींचे गट बदलणार असून जिल्हा प्रशासनापुढील पेच वाढला आहे. या प्रकल्पासाठी लवकरात लवकर जमिनी संपादीत करण्याचे आव्हान असताना या नव्या पेचामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

नाशिक आणि पुण्याचा सुवर्ण त्रिकोणात समावेश होत असला तरी ही दोन्ही शहरं अद्याप रेल्वे मार्गाने थेट जोडली गेलेली नाहीत. नाशिक – पुर्ण रेल्वेमार्ग प्रकल्प अनेक वर्षे प्रलंबित असून त्याला गती देण्यास सुरूवात झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागावा याकरीता लवकरात लवकर जमिनी संपादीत करा, असे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

याबाबत वारंवार बैठका घेऊन या प्रकल्पाचा आढावाही घेतला जातो आहे.सिन्नर तालुक्यातील अनेक गावांमधील जमिनींचे जिरायती, हंगामी बागायती आणि बागायती अशा वर्गीकरणानुसार दरही जाहीर करण्यात आले असून काही गावांमध्ये शेतकर्‍यांच्या जमिनींची खरेदी प्रक्रीया देखील जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे.

महारेलने पुर्वी सादर केलेल्या डिमार्केशननुसार त्या – त्या गावांमध्ये जमिनींचे कोणते गट संपादीत करायचे हे जिल्हा प्रशासनाला स्पष्ट झाले. त्यामुळे प्रशासनाने संबंधित शेतकर्‍यांकडे जमिनी देण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. असे असताना आता सिन्नर तालुक्यातील 17 पैकी 11 गावांत महारेलने डिमार्केशनबाबत बदल सूचविल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे. परंतु यामुळे अधिग्रहीत करावयाचे गट इतकेच नव्हे तर शेतजमिनींचे मालक देखील बदलण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनापुढील पेच वाढला आहे.

या गावांचा समावेश

सिन्नर आणि नाशिक तालुक्यातील एकूण 23 गावांमधून हा रेल्वे मार्ग जातो. त्यामध्ये सिन्नर तालुक्यातील वडगांव पिंगळा, चिंचोली, मोह, वडझिरे, देशवंडी, पाटपिंप्री, बारागाव पिंप्री, कसबे सिन्नर, कुंदेवाडी, मुसळगाव, गोंदे, दातली, शिवाजीनगर, दोडी, नांदुर शिंगोटे, चास आणि नळवाडी या गावांचा समावेश आहे. याशिवाय नाशिक तालुक्यातील देवळाली, विहीतगाव, बेलतगव्हाण, संसारी या गावांमधील जमिनी देखील संपादीत करण्यात येणार आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *