Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्या‘महाज्योती’ संस्थेच्या योजना कागदावरच!

‘महाज्योती’ संस्थेच्या योजना कागदावरच!

नाशिक | प्रतिनिधी

‘सारथी’ आणि बार्टीच्या धर्तीवर इतर मागासवर्गातील स्पर्धा परीक्षार्थीना प्रशिक्षण व आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘महाज्योती’ संस्थेला सरकारने अद्याप पैसा दिलेला नाही.

- Advertisement -

सरकारने करोनाकाळातही ‘सारथी’ला ११ कोटींची मदत करून १३० कोटींच्या नवीन प्रस्तावाला मंजुरी दिली. ओबीसी विद्यार्थी सरकारचे नाहीत का, असा सवाल आता विचारला जात आहे. सरकारच्या या दुजाभावामुळे एकही विद्यार्थी अद्याप ‘महाज्योती’चा लाभार्थी नाही.

इतर मागासवर्ग, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग आणि विमुक्ती जाती आणि भटक्या जमाती या प्रवर्गाचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकास करण्याच्या उद्देशाने ‘महाज्योती’ अर्थात महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आली.

गेल्या दहा वर्षांपासून बार्टी, तर एक वर्षांपासून सारथी या संस्थेद्वारे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी दिल्लीतील नामवंत शिकवणी वर्गामध्ये मार्गदर्शन केले जाते.

याद्वारे दिल्लीतील प्रशिक्षणासाठी २ लाख ५० हजार रुपये, निवासासाठी १ लाख ५० हजार रुपये, पूर्वपरीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांला ५० हजार रुपये, तर मुख्य परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांला समोरील प्रशिक्षणासाठी २५ हजार रुपये दिले जातात; परंतु वरील दोन्ही योजना या फक्त अनुसूचित जाती व मराठा-कुणबी या वर्गासाठीच असल्यामुळे आजपर्यंत एकाही ओबीसी विद्यार्थ्यांला याचा लाभ मिळाला नाही.

या वर्षीसुद्धा बार्टी व सारथी या दोन्ही संस्था नागरी सेवा पूर्वपरीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेच्या दर्जेदार प्रशिक्षणासाठी ५० हजार रुपयांची मदत करणार आहेत. या धर्तीवर ‘महाज्योती’तर्फे या वर्षी योजना सुरू करणे अपेक्षित होते. मात्र, सरकारकडून ‘महाज्योती’ला कुठलीही आर्थिक मदत मिळाली नाही.

शासनादेश निघूनही निधी नाही..

बार्टीकडून या वर्षी १५०, तर सारथीकडून २२५ विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी प्रति विद्यार्थी ५० हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेच्या निकालात अनेक ओबीसी विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दोन महिन्यांपासून ‘महाज्योती’ला पाच कोटी रुपये देण्याचा शासनादेश निघाला आहे. मात्र, आतापर्यंत ‘महाज्योती’च्या खात्यात पैसे जमा झालेले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या