भगवान ऋषभदेवांच्या महामस्तकाभिषेक महोत्सवास प्रारंभ

भगवान ऋषभदेवांच्या महामस्तकाभिषेक महोत्सवास प्रारंभ

ऋषभदेवपुरम, मांगीतुंगी। प्रतिनिधी Rishabhdevpuram, Mangitungi

येथे भगवान ऋषभदेवांच्या जयजयकारात आज महामस्तकाभिषेक महोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. काल सकाळी 7 वाजता मुख्य यजमान व प्रथम कलशकर्ता यांच्या उपस्थितीत ऋषभदेवपुरम येथून शोभायात्रा काढण्यात आली.पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामीजींनी अर्घ्य समर्पण केले. गणिनीप्रमुख श्री ज्ञानमती माताजी व प्रज्ञाश्रमणी आर्यिका श्री चंदनामती माताजी यांचे स्मरण करून श्रीफळ अर्पण करण्यात आले.स्वामीजींनी प्रास्ताविकात शुभारंभानिमित्त आशीर्वाद दिले.

शोभायात्रेत सुरुवातीला मालेगाव महिला मंडळाने लेझीमनृत्य सादर केले. ठाणे महिला बँडद्वारा दिव्यघोष करून वातावरणात पावित्र्य निर्माण झाले. दर सहा वर्षांनी होणार्‍या भगवान ऋषभदेव महामस्तकाभिषेक उत्सवाचे ध्वजारोहण चेन्नईच्या नथ्थी देवी,कमल - निशी ठोलिया परिवाराच्या हस्ते अत्यंत उत्साहात करण्यात आले. यावेळी पोलीस बँडने सलामी दिली. प्रसिद्ध कवयित्री अनामिका अंबर व संघस्थ ब्रह्मचारिणी यांनी मंगलाचरण सादर करून मंगलमय वातावरणात मोलाची भर घातली. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद कवीनगर येथून आलेले जम्बूप्रसाद जैन यांनी प्रथम कलश तर सुरतच्या विद्याप्रकाश, संजय व अजय जैन परिवाराने द्वितीय कलशाचा शुभारंभ केला. विशेष कलश ठोलीया परिवाराच्या हस्ते संपन्न करण्यात आला.

प्रसिद्ध कवी सौरभ जैन व अनामिका अंबर यांनी भक्तिमय ऋषभदेव काव्यपाठ सादर केले. यावेळी ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील उपस्थित होते. संस्थेतर्फे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्याध्यक्ष अनिलकुमार जैन, महामंत्री संजय पापडीवाल, अधिष्ठाता सी.आर.पाटील, विश्वस्त प्रमोद कासलीवाल, भूषण कासलीवाल, डॉ. जीवनप्रकाश जैन व पदाधिकारी, सहकारी उपस्थित होते. सायंकाळी नाशिकच्या महिला मंडळाने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यात भजन, गायन, नृत्याने रंगत वाढवली. सुवर्णा शीतल पाटणी, मंजुषा पहाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

पंचामृत कलशात नारळपाणी, ऊसाचा रस, तूप, दूध, दही, सर्वौषधि, हरिद्रा, लालचंदन, श्वेत चंदन, चतुष्कोण कलश, केशर, सुगंधी फुले यांचा समावेश करण्यात आला. संघपती अनिल कुमार व अनिता जैन (नवी दिल्ली ), अनामिका जैन, प्रमोद जैन (नवी दिल्ली),अध्यात्म अर्पिता व सम्यक जैन,आदीश जैन, नितीशकुमार जैन (लखनऊ ), अमरचंद जैन व जयकुमार जैन ( टिकेतनगर ), नरेश बन्सल ( गुडगाव ) राजकुमार सेठी व अजितकुमार पन्ड्या (कोलकाता), विनोद जैन ( सिवान ), संजीव जैन ( अलाहाबाद ), अजय व साधना जैन ( मेरठ ) यांनी पंचामृत अभिषेक केला. काल आलेल्या सर्व भाविकांना विनामूल्य भोजन प्रसादाचे वितरण करण्यात आले. त्याचा संपूर्ण खर्च लक्ष्मी व मदनलाल जैन, मुकेश व मालिका, रिवान, श्लोक जैन, साखूनिया परिवार यांनी श्रद्धापूर्वक केला. दिवसभर दूरवरून आलेल्या भाविकांची वर्दळ सुरू होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com