परवानाधारक बार-हॉटेलच्या वेळेचा घोळ

एकाला एक दुसर्‍याला दुसरा न्याय नकोच
परवानाधारक बार-हॉटेलच्या वेळेचा घोळ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्य शासनाने राज्यातील बार, हॉटेल्स व रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी देताना जिल्हाधिकार्‍यांना स्थानिक करोना स्थिती पाहून वेळेचे बंधन घालण्याचे अधिकार दिले आहेत.

याच अधिकारांचा वापर करत जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यात बार, हॉटेल, रेस्टॉरंट सुरू ठेवण्यास सकाळी 7 ते सायंकाळी 7 ही वेळ दिली आहे. राज्य शासनाने ही वेळ सकाळी 10 ते रात्री 10 दिलेली असताना आणि नाशिकमधील करोना रुग्ण कमी होत असताना नाशिकला शासनाने जाहीर केलेली वेळ का दिली जात नाही? एकाला एक न्याय, दुसर्‍याला दुसरा न्याय का? असा प्रश्न नाशिक जिल्हा बार, हॉटेल्स अ‍ॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन यांनी उपस्थित केला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्यानंतर राज्य शासनाने सर्वात प्रथम मद्यविक्रीला सामाजिक अंतरासह इतर अटींसह सशर्त परवानगी देताना महसुलाला महत्त्व दिले होते. आताही राज्यातील बार, हॉटेल्स व रेस्टारंट यांना सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी देताना हा उद्देश समोर ठेवत नुकतीच परवानगी दिली आहे.

मात्र शासनाने स्थानिक पातळीवर करोनाची स्थिती पाहून वेळेच्या नियोजनासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना अधिकार दिले आहेत. याच अधिकारातून जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यात बार, हॉटेल्स व रेस्टॉरंट यांना सकाळी 7 ते सायं. 7 वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. नाशिक शहरात बार, हॉटेल्स व रेस्टॉरंटमध्ये येणारा ग्राहक सायंकाळी 7-8 वाजेनंतर येत असल्याने अशाप्रकारे ग्राहक येण्याच्या वेळेत जर ते बंद होणार असेल तर 5-6 महिन्यातील नुकसान भरून कसे निघणार असा प्रश्न आता या संचालकांनी उपस्थित केला आहे.

संचालकांकडून सामाजिक अंतर, सॅनिटाइझेशन, मास्कचा वापर आदींसह दिलेल्या नियमांचे पालन करण्याची तयारी करण्यात आलेली असताना आता वेळेच्या बंधनाचा मोठा फटका बसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरात गेल्या सात-आठ दिवसात नवीन करोना रुग्णांची संख्या निम्म्यावर आली असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकला सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यत परवानगी द्यावी, याकरिता आता असोसिएशन पालकमंत्र्यांना साकडे घालणार आहे.

पुणे, नागपूर, नगर, लातूर जिल्ह्यातील करोनाची स्थिती सारखीच स्थिती नाशिक जिल्ह्यात आहे. असे असतांना त्याठिकाणी रात्री किमान नऊ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. याठिकाणी बार, हॉटेल्स व रेस्टॉरंट नियम अटींचे पालन करुन व्यवसाय सुरू आहे. अशीच काळजी नाशिक जिल्ह्यात घेतली जात असतांना नाशिक जिल्ह्यात अन्याय का? असा प्रश्न आता बार, हॉटेल्स व रेस्टॉरंट व्यावसायिकांकडून उपस्थित केला जात आहे.

या निर्णयामुळे अनधिकृत हॉटेल्सची चांदी

जिल्ह्यातील बार, हॉटेल्स व रेस्टॉरंटकडून करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच अटींचे पालन केले जात आहे. करोनाची पुणे, नागपूरची स्थिती नाशिकपेक्षा खराब असताना या ठिकाणी शासनाच्या आदेशानुसार परवानगी दिलेली आहे. नाशिकमधील वेळेच्या बंधनामुळे सरकारचा महसूल कमी होत असून अनधिकृतपणे मद्यविक्री करणार्‍यांची चांदी होत आहे. अनधिकृत मद्यविक्रीतून महसूल बुडत आहे. यामुळे नाशिकला निदान सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी द्यावी.

- संजय चव्हाण, अध्यक्ष, जिल्हा बार, हॉटेल्स व रेस्टॉरंट असो.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com