Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याधुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

सिन्नर। अमोल निरगुडे

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात बिबट्यांचा ( Leopard )सुळसुळाट बघायला मिळत असून दररोज कुठे ना कुठे बिबटे दिसून येत आहे. तर अनेक बिबट्यांना जेरबंद करण्यातही वनविभागाला यश मिळत आहे. आज (दि.16) तालुक्यातील मनेगाव (Manegaon )येथे धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसापासून बिबट्याने या परिसरात धुमाकूळ घातला होता. बिबट्याने या परिसरातील पाळीव कुत्रे व कोंबड्यांना भक्ष्य केले होते. या परिसरात मका व ऊस शेती जास्त असल्याने बिबट्याचा वावर वाढला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी वनविभागाकडे केली होती.

सिन्नरच्या वनपरिक्षेत्राधिकारी मनीषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनमंडळ अधिकारी सुजीत बोकड व वन कर्मचाऱ्यांनी भातओहळ परिसरातील आमदार मळा या भागातील संतोष जगन्नाथ शिंदे यांच्या गट शेत नंबर 286 मध्ये पिंजरा लावला होता. मात्र, बिबट्या हुलकावणी देत होता.वनकर्मचाऱ्यांनी पिंजऱ्याची दिशा बदलल्यानंतर रात्रीच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.

पहाटेच्या सुमारास बिबट्यांच्या डरकाळी ऐकू येऊ लागल्या. सकाळी 6 वाजेच्या सुमारास उजेडल्यानंतर शेतकऱ्यांनी पिंजऱ्याकडे जाऊन पाहणी केली. पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी वनविभागाला दिली. सिन्नरच्या वनपरिक्षेत्राधिकारी मनीषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनमंडळ अधिकारी सुजीत बोकड, वत्सला कांगणे, बालम शेख, रोहित लोणारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याची रवानगी मोहदरीच्या वनउद्यानात केली. पाच वर्षे वयाचा नर बिबट्या असल्याची माहिती वन विभागाने दिली.

मादीसह बछड्यांचेही वास्तव्य

भातओहळ परिसरात ऊस आणि मक्याची शेती मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या काही दिवसापासून या परिसरात मादीसह बछड्यांचा आवाज येत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. ऊस व मक्याच्या शेतात मादीसह बछड्यांचा वावर असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. यामुळे परिसरातील शेतकरी शेती कामांना जाण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या