
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
ओबीसी समाजाला (OBC Community) नेहमीच गाजर देणाऱ्या भाजपची (BJP) राज्यभरात "बेगडी जागर" यात्रा निघाली आहे, अशी जळजळीत टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी एक्सवरून (ट्वीटर) केली. ओबीसींचे आरक्षण घालविणाऱ्या कंत्राटी नोकरभरतीचे आदेश रद्द करणार का? असा सवालही त्यांनी राज्य सरकारला उद्देशून केला आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने आजपासून ओबीसी जागर यात्रेचे आयोजन केले आहे. ओबीसी समाजातील भाजपचा जनाधार वाढविण्याच्या हेतूने या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेचाही वडेट्टीवार यांनी आज खरपूस समाचार घेतला...
ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण (Reservation) असताना सरकारी नोकरीत ओबीसी कर्मचाऱ्यांची संख्या फक्त १२ टक्के का? १५ टक्के जागा रिक्त का ठेवण्यात आल्या आहे? परदेशी शिक्षणासाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती संख्या १०० विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार का? सत्तेत आल्यावर एक महिन्यात ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याचे वचन भाजपचे उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी दिले होते. सत्तेत येऊन दीड वर्ष होत आले ओबीसीचे कमी झालेले राजकीय आरक्षण परत कधी देणार? ओबीसी समाजासाठी काँग्रेसने विलासराव देशमुख यांच्या काळात ५० टक्के शिष्यवृत्ती योजना आणली होती, ती १०० टक्के करणार का? असे सवाल करत ओबीसी जागर यात्रेत खालील गोष्टींवर जागर करा, असे आव्हान वडेट्टीवार यांनी भाजपला दिले.
गुपचूप सरसकट कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप केले जात आहे. त्यावर कारवाई करण्याची मागणी बावनकुळे करणार का? बोगस प्रमाणपत्रावर ओबीसींच्या हक्काच्या नोकऱ्या लाटणाऱ्यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी ते गृहमंत्र्यांकडे करणार का? खोट्या प्रमाणपत्राद्वारे नोकऱ्या मिळवून मंत्रालयात बसलेल्यांचा शोध बावनकुळे घेणार काय? केंद्र सरकारच्या ९० अधिकाऱ्यांपैकी फक्त ३ टक्के ओबीसी का? पंतप्रधानांकडे ओबीसींची जनगणना करण्याची मागणी करणार का? असे सवालही वडेट्टीवार यांनी केले आहेत.
तसेच ओबीसी समाजाला त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची माहिती भाजपने द्यावी आणि नंतरच प्रामाणिकपणे जागर करावा. मतांचे राजकारण करण्यासाठी ओबीसी समाजाला तुमच्या पक्षाचे इव्हेंट बनवू नका, असेही विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भाजपला सुनावले आहे.