कंटेनरच्या धडकेत वकील ठार

नेहरु चौकातील घटना; कंटेनरसह चालक ताब्यात
कंटेनरच्या धडकेत वकील ठार

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

रेल्वे स्थानक परिसरातील पक्षाकारांकडे कागदपत्र घेण्यासाठी जात असलेल्या वकीलाला (lawyer) कंटेनरने धडक (Hit by container) दिल्याची घटना सोमवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास नेहरुचौकात (Nehru Chowk) घडली. या अपघातात योगेश जालमसिंग पाटील (वय-45, रा. दादावाडी) यांचा उपचार सुरु असतांना मृत्यू (death) झाला. धडक देणार्‍या कंटेनरसह चालकाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मूळचे चाळीसगाव तालुक्यातील तमगव्हाण येथील योगेश पाटील हे सद्या दादावाडी परिसरात वास्तव्यास होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते जिल्हा न्यायालयात वकीली करत होते. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ते त्यांच्या ऑफिसमधील सहकार्‍यांना रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या पक्षकाराकडे कागदपत्रे घेण्यासाठी जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर योगेश पाटील हे त्यांच्या (एमएच 19 सीई 6511) क्रमांकाच्या दुचाकीने नेहरु चौकातून रेल्वे स्थानकाकडे जात होते.

याचवेळी रेल्वे स्थानकाकडून टॉवरचौकाकडे जाणार्‍या (एमएच 19 सीवाय 2231) क्रमांकाच्या कंटेनरने योगेश पाटील यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात पाटील यांच्या छातीला व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने नागरिकांनी त्यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असतांना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

वडीलांच्या श्राद्धासाठी जाणार होते गावाला

योगेश पाटील यांच्या वडीलांचे मंगळवारी श्राद्ध असल्याने त्यांचे कुटुंबिय त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. योगेश पाटील हे देखील आपले दैनंदिन कामकाज आटोपून गावी जाणार होते. परंतु त्यापुर्वीच त्यांच्यावर काळाने झडप घातल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. अपघातात योगेश पाटील यांचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच न्यायालयातील त्यांच्या सहकार्‍यांनी जिल्हा रुग्णालयात प्रचंड गर्दी केली होती.

कंटेनरसह चालक ताब्यात

कंटनेरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी एमआयडीसी परिसरातून कंटेनरसह चालकाला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com