
मुंबई | Mumbai
सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी पूर्ण झाली असून लवकरच याप्रकरणी निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. सर्वोच्च न्यायालयात सरकार स्थापन करण्याच्या काही दिवस आधीपासूनच याबाबत सुनावणी सुरु आहे....
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे 16 आमदार यात अपात्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या खटल्याच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.
न्यायमूर्ती शाह दि. 16 मे रोजी निवृत्त होत आहेत. या खटल्यामध्ये शाह यांनी न्यायमूर्ती म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीच्या आधी हा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. यावर आता वकील असीम सरोदे यांनी निकालाबाबत 4 शक्यता वर्तवल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे...
वकील असीम सरोदे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, महाराष्ट्र सत्तासंघर्षप्रकरणी निकाल 11 किंवा 12 मे 2023 ला लागेल. निकाल काय असेल याबाबत केवळ काही कायदेशीर शक्यता व्यक्त करता येऊ शकतात.
1.आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे पाठवणे ही एक मोठी शक्यता सोप्या निर्णयाचा भाग म्हणून जास्त आहे.
2. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी फ्लोआर टेस्ट घ्या, विधानसभेत बहुमत सिद्ध करा असा आदेश काढला तो काढण्याचा त्यांना अधिकारच नव्हता. राज्यपालांनी बहुमत चाचणीचा दिलेला आदेश रद्द ठरवण्याची शक्यता आहे.
3. पक्षविरोधी कारवाया केल्या असे म्हणून 16 आमदारांना थेट स्वतःच अपात्र ठरविण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घटनेतील कलम 142 चा वापर करून घेईल. कारण बहुमत चाचणी आदेश ही राज्यपालांची कृतीच घटनाबाह्य असल्याने ती रद्द करण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहेत.
4. एक धूसर व कदाचित अस्पष्ट शक्यता आहे की, हे प्रकरण मोठ्या संविधानिक गुंतागुंतीचे आहे व त्यामुळे 10 व्या परिशिष्टा संदर्भात आधी झालेल्या निर्णयांचा संदर्भ घेऊन हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवले जाऊ शकते. ही शक्यता धूसर आहे व तसे होणार नाही असे वाटते.
अशा चार शक्यता वकील असीम सरोदे यांनी ट्विट करत सांगितल्या आहेत. आता सत्तासंघर्षाचा निकाल नेमका कधी लागणार? १६ आमदार अपात्र ठरणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.