कार्यक्षम गृहमंत्री फडणवीसांच्या राज्यात हप्तेखारी- आ.एकनाथराव खडसे

जिल्ह्यासह राज्यात कायदा सुव्यवस्था गंभीर ; पोलीस यंत्रणा भ्रष्ट
एकनाथ खडसे
एकनाथ खडसेराजकीय

जळगाव - jalgaon

जळगाव जिल्ह्यात गावठी कट्टे, गुटखा, गांजाची तस्करी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. जिल्ह्यासह राज्यात अवैध धंदे सर्रासपणे सुरू असून पोलीस यंत्रणेत खालपासून ते वरपर्यंत मोठी हप्तेखोरी आहे. कार्यक्षम गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या राज्यात कधी नव्हे तो कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला असल्याचा टोला राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे (MLA Eknathrao Khadse) यांनी आज एका पत्रकार परिषदेत लगावला.

जळगाव येथील मुक्ताई या निवासस्थानी राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी आज पत्रकार परीषद घेतली. यावेळी ते पुढे म्हणाले की, वर्षभरापूर्वी राज्यात सत्तांतर झाले. एकनाथ शिंदेंसोबत 40 आमदारांनी बंडखोरी केली. ही बंडखोरी प्रेमामुळे केली की खोक्यांमुळे? हा प्रश्न आहे. बंडखोर आमदारांनीच खोक्यांचा विषय पुढे आणला. बंडखोरी करतांना आमदारांनी काही कारणे दिली. त्यात आमचा भागाचा विकास व्हावा म्हणून बंडखोरी केल्याचे प्रमुख कारण सांगण्यात आले. मग सत्तापरिवर्तनानंतर राज्यातील कुठल्या भागाचा विकास झाला. किमान जळगाव जिल्ह्याचा तरी विकास झाला का? असा सवाल आमदार खडसे यांनी उपस्थित केला.

उमर्टीचे रहस्य न उलगडणारे

राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा पार बोजवारा झाला असल्याची टीका आमदार एकनाथराव खडसे यांनी केली. उमर्टी या छोट्याशा गावातून गावठी कट्ट्यांची तस्करी केली जाते. हे माहित असूनही कार्यक्षम असलेले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्याकडे लक्ष देत नाही. उमर्टीत कारवाई का होत नाही? हे रहस्य न उलगडणारे असल्याचे त्यांनी सांगितले.

जलजीवन मिशन भ्रष्टाचाराचे कुरण

केंद्र शासनाची जलजीवन मिशन योजना म्हणजे भ्रष्टाचाराचे मोठे कुरण आहे. या योजनेत बोदवड तालुक्यातील 44 गावांचा समावेश असून भूजल विभागाने याठिकाणी पाण्याचे स्त्रोत असल्याचा दाखला दिला आहे. प्रत्यक्षात तिथे कुठेही पाणी नाही. मग योजना राबविण्यासाठी टेंडर निघाले कसे? योजना राबविलीच कशी जाते? याची चौकशी झाली पाहिजे असेही आ. खडसे यांनी सांगितले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com