Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : सुखासाठी माणसाची सदैव धडपड

Video : सुखासाठी माणसाची सदैव धडपड

नाशिक । विशेष प्रतिनिधी Nashik

अध्यात्मिक भूमिकेतून पाहिले तर सुख म्हणजे गुन्हा नाही. सुखासाठी माणसाची सदैव धडपड चालू असते. अहोरात्र मेहनत, धडपड आणि आशा असते. सुख मिळाले नसते तर सुखाचे स्वरूपच कळाले नसते. आजीवन सुखासाठी प्रयत्न करणारा मनुष्य आपल्या जीवनात सुख नाही, असे म्हणून कधी प्रयत्न थांबवत नाही. नित्य व्यवहारातून त्याला सुख मिळत असते् सुख पाहता जवापाडे, दु:ख पर्वता एवढे असे तुकाराम महाराजांसारखे संतही मान्य करतात, असे विचार प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.चैतन्यमहाराज देगलूरकर ( Chaitanyamaharaj Deglurkar) यांनी मांडले.

- Advertisement -

प.पू. वै.बस्तीरामजी सारडा यांच्या 60 व्या पुण्यतिथी सोहळ्याला (Late Bastiramji Sarada Death Anniversary )आज येथील परशुराम सायखेडकर नाट्यगृहात प्रारंभ झाला. यानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ‘धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष’ या विषयावर चैतन्यमहाराजांनी पहिले पुष्प गुंफले. प्रारंभी त्यांनी बस्तीरामजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दै.’देशदूत’चे संचालक जनक सारडा यांनी पुष्पगुच्छ देऊन चैतन्यमहाराजांचे स्वागत केले. त्यानंतर महाराजांनी व्याख्यानास सुरूवात केली.

गेली 60 वर्षे ही व्याख्यानमाला आयोजित केली जात आहे. आतापर्यंत अनेक मान्यवर विचारवंतांनी श्रोत्यांशी संवाद साधला. गेल्या काही वर्षांपासून या व्याख्यानमालेत विचार मांडण्याचे भाग्य मला लाभले आहे, असे सांगून चैतन्यमहाराज यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

चैतन्यमहाराज म्हणाले, अध्यात्मिक विचार करणार्‍या माणसांना धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या मानवी जीवनातील चार पुरुषार्थांची साधारण कल्पना असते. धर्म आणि मोक्षाकडे पाहिले जाते, पण अर्थ आणि कामाकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. मानवी जीवनात मोक्ष आणि धर्म जेवढा महत्त्वाचा तेवढाच अर्थ आणि काम महत्त्वाचा आहे. अध्यात्मात अर्थ आणि कामाबद्दल निषेध करावा, अशी भावना निर्माण होते. संज्ञा नाकारता येऊ शकते, पण संकल्पना नाकारता येत नाही. मोक्ष हा शब्द ऐकला की, आपला त्याच्याशी काही संबंध नाही, असे म्हणण्यात पुरूषार्थ मानणारे लोक पुरूषार्थ नाकारण्यात पुरुषार्थ मानतात.

मोक्ष हा विषय ग्रंथातील, अध्यात्मातील आहे, त्यासाठी ग्रंथवाचन करावे लागते, त्यासाठी वारी करावी लागते, नामस्मरण करावे लागते, असे त्यांना वाटते. मोक्ष ही संज्ञा नाकारली तरी ही संकल्पना नाकारू शकतो का? ज्या सुखाची माणसाला अपेक्षा आहे, जन्मापासून मरणाच्या क्षणापर्यंत असे सुख नसते, असे म्हणणारा जीव या पृथ्वीतलावर अजून जन्माला आलेला नाही. सुखाबद्दल माणसाच्या कल्पना कशी असतात त्यावर चैतन्यमहाराजांनी भाष्य केले. सगळ्यांना गरज असते ती गोष्ट कधीही चुकीची नसते. ती प्राप्त करणे काही गैर नाही. संपत्ती, अन्न, पाणी, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी त्याला प्रयत्न करावे लागत असतील तर त्यात गैर म्हणता येणार नाही.

अन्न, पाणी मिळवणे गैर नाही, पण पाण्याचे राजकारण करणे हा गुन्हा आहे. ज्या पदार्थाची नित्य प्राप्ती होत नाही त्यात माणसाला स्वरास्य नसते. ज्याची-ज्याची अपेक्षा आहे ती सुखाकरताच असते. चांगली गाडी, चांगले घर, चांगले खाणे हे सर्व सुखासाठीच आहे. ज्या सुखाची अपेक्षा आहे, ज्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत त्या सुखाचे नेमके स्वरूप काय? जे सुख हवे ते दु:ख जाऊन मिळावे, असे माणसाला वाटते. दु:खाचा संपर्क ज्या सुखाशी आहे अशा जास्तीच्या सुखाकडेही माणूस प्रवृत्त होत नाही. माणूस प्रतिकूलतेचा जितका विचार कतो तितका अनुकूलतेचा विचार करीत नाही.

संतांनी सुखाची भाषा सांगितली त्या संतांनी भोगलेल्या सुखापेक्षा आमचे सुख बरे आहे. दु:खाचा अतिरेक संतांच्या जीवनात दिसतो. तेवढे दु:ख आपल्या वाट्याला आलेले नाही. दु:ख मिळणार, असे गृहित धरूनच सुखाचा विचार केला जात नाही. जी गोष्ट आपल्यातून कधी तरी निवृत्त होणार आहे त्याच्याबद्दल किती ममत्त्व भाव ठेवणार? त्यातूनच दु:ख प्राप्ती होते. परिवर्तन हा जगाचा स्वभाव आहे. निर्मिती होणे, नष्ट होणे चालणारच. मोक्ष मिळेपर्यंत प्रयत्न करणे अटळ आहे. त्याला मर्यादा आहे. साध्यापर्यंत नेऊन पोहोचवते ते साधन आहे, असे महाराज म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या