पंतप्रधान मोदी यांना लता मंगेशकर पुरस्कार

पंतप्रधान मोदी यांना लता मंगेशकर पुरस्कार

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) यांना पहिला भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार (First Bharat Ratna Lata Dinanath Mangeshkar Award )जाहीर करण्यात आला आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये या पुरस्कारांची घोषणा केली.

24 एप्रिल रोजी मुंबईत षण्मुखानंद हॉलमध्ये होणार्‍या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्यास पंतप्रधानांनी अनुकुलता दर्शवल्याची माहिती देखील मंगेशकर यांनी यावेळी दिली.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी लतादीदींना बहीण मानायचे. नरेंद्र मोदी जे देशसेवा करत आहेत, जे काम करत आहेत ते पाहूनच त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

प्रत्येक क्षेत्रातील दिग्गजांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर यांना देखील या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. दीदींच्या नावाला शोभेल अशाच पुरस्कारार्थीला हा पुरस्कार दिला जाणार आहे.

याच पत्रकार परिषदेमध्ये उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर यांनी मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2022 पुरस्कारांचीही घोषणा केली. संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी राहुल देशपांडे यांना तर सिनेमात भरीव योगदान दिल्याबद्दल आशा पारेख, जॅकी श्रॉफ यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

त्याशिवाय उत्कृष्ट सामाजिक सेवेचा पुरस्कार मुंबई डबेवाले संघटनेला देण्यात आला आहे. नाट्यक्षेत्रातील सर्वोत्कृष्ट नाट्यनिर्मितीसाठी म्हणून ‘संज्याछाया’ नाटकाला जाहीर झाला आहे.

Related Stories

No stories found.