लासलगाव बाजार समिती राज्यात प्रथम

लासलगाव बाजार समिती राज्यात प्रथम

लासलगाव। वार्ताहर Lasalgaon

जागतिक बँक अर्थसहाय्यित स्व. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परीवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत ( राज्यातील बाजार समित्यांच्या वार्षिक क्रमवारीत लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीची ( Lasalgaon APMC )राज्यात प्रथम क्रमांकाने निवड झाल्याची माहिती बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली आहे.

जागतिक बँक अर्थसहाय्यित स्व. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परीवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राबविण्यात येत असुन या प्रकल्पांतर्गत बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी प्रकाशित करणे हा एक प्रमुख घटक आहे. त्याअंतर्गत बाजार समितीच्या वार्षिक कामगिरीच्या आधारावर मुल्यांकन करून राज्यभरातील बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी प्रकाशित करणे अपेक्षित होते.

पणन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत स्मार्ट प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (कृषि पणन) यांचेमार्फत बाजार समित्यांमधील पायाभुत व इतर सेवा सुविधा निकषांसाठी 80 गुण, आर्थिक निकषांसाठी 35 गुण, वैधानिक कामकाज निकषांसाठी 55 गुण व इतर निकषांसाठी 30 गुण असे एकुण 200 गुण निश्चित करण्यात आले होते.

त्यानुसार प्रकल्प अंमलबजावणी कक्षाने ठरवुन दिलेल्या गुणांकनानुसार लासलगाव बाजार समितीच्या सन 2021-22 या वर्षाच्या वार्षिक कामगिरीची पहाणी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, निफाड यांचे कार्यालयाने करून वस्तुनिष्ठ गुणांकनाचा प्रस्ताव पणन संचालनालयातील स्मार्ट प्रकल्प अंमलबजावणी कक्षास सादर केला होता.

प्रकल्प अंमलबजावणी कक्षाने सदर प्रस्तावाची छाननी करून सन 2021-22 या वर्षाच्या वार्षिक क्रमवारीत लासलगाव बाजार समितीस एकुण 200 गुणांपैकी 163 गुण देऊन राज्यस्तरीय क्रमवारीत प्रथम क्रमांक दिलेला आहे. नुकतेच अमृत महोत्सवी वर्ष पार केलेल्या लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीने गेल्या 75 वर्षांमध्ये शेतकरी बांधव व इतर बाजार घटकांसाठी उभारणी केलेल्या विविध पायाभुत सुविधा, आर्थिक व वैधानिक कामकाज, शेतकरी बांधवांसाठी राबविण्यात येत असलेल्या शासनाच्या विविध योजना, उपक्रम यातील कामगिरी उल्लेखनीय असल्याने स्मार्ट प्रकल्प अंमलबजावणी कक्षाचे प्रमुख तथा राज्याचे पणन संचालक सुनिल पवार यांचे अध्यक्षतेखालील समितीने राज्यस्तरीय क्रमवारीत लासलगाव बाजार समितीस प्रथम क्रमांकाचे मानांकन निश्चित केले असल्याचे पत्रान्वये बाजार समितीस कळविले आहे.

क्रमांक राखण्यास कृऊबा कटीबद्ध

बाजार समित्यांच्या वार्षिक क्रमवारीत राज्यातील 305 बाजार समित्यांमध्ये लासलगाव बाजार समितीने प्रथम क्रमांक पटकाविला असुन बाजार समितीच्या या यशात बाजार समितीचे सर्व सदस्य मंडळ तसेच सहकार व पणन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मार्गदर्शनाखाली समितीतील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच शेतकरी बांधव व इतर सर्व मार्केट घटकांचा मोलाचा वाटा आहे. वार्षिक क्रमवारीत प्राप्त केलेल्या प्रथम क्रमांकाचे स्थान कायम राखण्यासाठी आम्ही सर्वजण कटीबद्ध आहोत.

नरेंद्र वाढवणे, सचिव (लासलगाव)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com