Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यासिपेट प्रकल्पासाठी शासनाकडून भूखंड निश्चित

सिपेट प्रकल्पासाठी शासनाकडून भूखंड निश्चित

देवळाली कॅम्प । वार्ताहर

जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षण मिळावे त्यातून रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठीसेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था (सिपेट) शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या केंद्रास व प्रकल्पासाठी गोवर्धन शिवारातील प्रस्तावित भूखंड निश्चित करण्यात आला असल्याची माहिती खा. हेमंत गोडसे यांनी दिली.

- Advertisement -

जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना शिक्षण देऊन प्रशिक्षित करण्याची गरज असल्याची मागणी अंबड, सातपूर, गोंदे, मुसळगाव, माळेगाव आदी औद्योगिक वसाहतींमधील कंपनी व उद्योजकांकडून खा. गोडसे यांच्याकडे सतत होत होती. याबाबत खा. गोडसे यांनी सिपेटसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडे गेल्या वर्षभरापासून प्रयत्न सुरु केले होते.

तसेच दिल्लीतील सिपेट प्रशासन आणि राज्याचे उद्योग विभागाचे सेक्रेटरी बलदेवसिंह यांच्याकडे सततचा पाठपुरावा केला होता. सिपेट प्रकल्पासाठी खा. गोडसे यांनी सातपूर जवळील गोवर्धन शिवार, नाशिक तालुक्यातील शिंदे आणि सैय्यद पिंप्री शिवारातील उपयुक्त शासकीय जागाही सुचविल्या होत्या.

खा. गोडसे यांची मागणी न्यायिक असल्याने अखेर सिपेट उभारणीच्या प्रस्तावास राज्य शासनाने मान्यता दिली तसेच. या प्रकल्पासाठी राज्य शासानाच्या उद्योग विभागाने गोवर्धन शिवारातील शासकीय भूखंड निश्चित केला आहे.

तसे पत्र राज्याच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाचे सहसचिव रविंद्र गुरव यांनी जिल्हाधिकार्‍यांना पाठविले असून गोवर्धन शिवारातील सर्वे नं. 33 मधील 12.33 हेक्टर आर इतकी जागा सिपेटकडे हस्तांतरित करण्याची कार्यवाही सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. हा प्रकल्प जिल्ह्यातील तरुणांसाठी एक वरदानच ठरणार आहे. तसेच प्रतिवर्ष सुमारे दोन हजार तरुणांना व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षणाची संधी मिळून त्यांना सहजपणे रोजगार उपलब्ध होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या