'क्रांती गाथा दालन' प्रेरणादायी ठरेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार

'क्रांती गाथा' हे आधुनिक तीर्थस्थळ म्हणून सर्वांना परिचीत होईल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
'क्रांती गाथा दालन' प्रेरणादायी ठरेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारे 'क्रांती गाथा' ( Kranti Gatha ) ही अत्यंत प्रेरणा देणारा उपक्रम असून हे भूमिगत दालन आणि जलभूषण सारखी नवीन वास्तू देशाला प्रेरणा देणारी ठरेल असे उद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी मंगळवारी येथे काढले.

राजभवन ( Rajbhavan ) येथे येथे 'क्रांती गाथा' भूमिगत दालन आणि राज्यपालांच्या 'जलभूषण' ( Jalbhushan )निवासस्थानाच्या उदघाटन पर कार्यक्रमानंतर नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, 'क्रांती गाथा' भूमिगत दालन व जलभूषण ही नवी वास्तू हे दोन्हीही देशासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. राज्यपाल यांनी म्हटल्याप्रमाणे 'राजभवन' हे लोकभवन म्हणून नावारूपास येईल. आज आपण एका चांगल्या कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित आहोत ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. यापूर्वीही मी अनेकदा राजभवनात आलो आहे.राजभवनाचे हे बदलले रूप निश्चीतच सर्वांना प्रेरणा देणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या शौर्य स्वातंत्र्यसाठी मोठे प्रेरणा देणारे आहे.

देशाच्या स्वातंत्र्य चळवळी ने अनेक देशांना प्रेरित केले. संत तुकाराम ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महान व्यक्तींच्या विचारांनी घडलेला महाराष्ट्राचे देशाच्या विकासात मध्ये मोठे योगदान दिले आहे. मुंबई तर स्वप्नांचं शहर आहेच आहे. मुंबई हे स्वप्नांचे शहर आहे, मात्र महाराष्ट्रात अशी अनेक शहरे आहेत जी 21 व्या शतकात देशाच्या विकासाची केंद्रे बनतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. याच विचाराने एकीकडे मुंबईच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण केले जात आहे आणि त्याच वेळी इतर शहरांमध्ये देखील आधुनिक सुविधांमध्ये वाढ केली जात आहे असे त्यांनी सांगितले.

शिक्षण क्षेत्राला माझ आग्रहाच सांगणे आहे की नव्या पिढीला आपला इतिहास माहिती झाला पाहिजे.आपण सहलीसाठी अनेक ठिकाणी मुलांना घेवून जातो मात्र अंदमान निकोबारच्या तुरूंगही विद्यार्थ्यांना दाखविला जावा जेणेकरून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बलीदान माहिती होईल. गेल्या 60 -70 वर्षा पासून राजभवन च्या खाली बंकर होता पण कुणालाच माहीत नव्हते. आज या वास्तू निश्चीत सर्वांना माहिती होतील असाही विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.

राजभवन हे लोकभवन बनेल : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, मला पंतप्रधानांनी यांनी या राज्याचा राज्यपाल म्हणून काम करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो.राजभवनात साकारलेले 'क्रांती गाथा' भूमिगत दालन व 'जलभूषण' निवासस्थान हे राज्याला प्ररेणा देणारे ठरेल.या वास्तूंसाठी काम केलेल्या सर्वांचे आभारही त्यांनी मानले. यावेळी राज्यपाल महोदयांनी राज्यात शिक्षण क्षेत्रातही आपण नविन उपक्रम राबवित असल्याचे यावेळी सांगितले.

राजभवन हे लोकभवन म्हणून यापुढे सर्वांना परिचित होईल. राजभवन च्या माध्यमातून लोकांना महाराष्ट्र कळण्यास मदत होईल. येथील निसर्ग सौंदर्य हे सर्वांना भुरळ घालत असते. राज्यपाल म्हणून काम करण्यासाठी दिलेल्या संधितून मी नक्कीच राज्यात चांगले उपक्रम राबवून लोकांसाठी काम करित राहणार असेही राज्यपाल यावेळी म्हणाले.

'क्रांती गाथा' हे आधुनिक तीर्थस्थळ म्हणून सर्वांना परिचित होईल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतांना क्रांती गाथा दालनाचे उदघाटन हा एक योगायोगच नाही तर एक चांगला मुहूर्त आहे. क्रांतीगाथा हे आधुनिक तीर्थस्थळ म्हणून सर्वांना परिचित होईल.

'दिव्यत्वाची जिथे प्रचिती तिथे कर माझे जुळती' असं म्हटलं जातं. जे स्वातंत्र्य उपभोगतो आहोत त्यासाठी कितीजणांनी आपल्या घरादारावर निखारे ठेवले, किती जणांनी बलिदान दिलं, कितीजणांनी मरण यातना सोसल्या, क्षणभर विचार केला हे असं घडलं नसतं तर आपण हे स्वातंत्र्य उपभोगू शकलो असतो का हा प्रश्न मनात येतो.

आपल्याला स्वातंत्र्य असंच नाही मिळाले, ते कुणी आपल्याला आंदण नाही दिलं हे स्वातंत्र्य आपल्याला लढून मिळवावं लागलं आहे. तो इतिहास नुसता जतन नाही तर जिवंत करणं हे आपलं काम आहे.काळ पुढे जात आहे.आपण पारतंत्र्यात १५० वर्षे होतो आता स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली, पुढे जात असतांना हा वारसा पुढच्या पिढीला देण्याच काम केलं नाही तर मला वाटतं आपण आपल्या कर्तव्याला मुकतो आहोत. आज एक अप्रतिम काम आपण करत आहोत, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, २०१६ ला हे भुयार सापडले. खंदक आणि भुयाराचा आज अप्रतिम उपयोग होतो आहे. तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांनी हे भुयार बघण्यास बोलावलं होतं. आता जी फिल्म बघितली त्यात याला तीर्थस्थळ म्हटलं आहे. हे एक तीर्थस्थळच आहे.महाराष्ट्रदिनी आपण एक पुस्तक प्राथमिक स्वरूपात तयार केलं आहे अजून ते पुर्ण व्हायचं आहे. माहिती गोळा होतेय. ज्ञात अज्ञात क्रांतीकारकांची.ज्ञात-अज्ञात क्रांतीकारकांचे ज्यांनी देशासाठी त्याग केला त्यांचे संकलन व्हायला पाहिजे म्हणून एक पुस्तक आपण तयार करत आहोत. नुसतं बोलत बसण्यापेक्षा क्रांतीकारकांनी ज्या गोष्टी केल्या त्यांच्या त्यागाच्या एक कण जरी काम आपण करू शकलो तरी त्यांचे बलिदान कृतार्थ होई असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले,'जलभूषण' या राज्यपालांच्या निवासस्थानाचे लोकार्पणही आज होत आहे. काळ बदलत असला तरी या परिसराने इतिहासाच्या पाऊलखुणा नेहमीच जपल्या आहेत. त्याला धक्का न लावता नुतनीकरण करणं, आधुनिक तंत्रज्ञानं हे काम करणं खुप मोठी गोष्ट. कलात्मक नजरेने याकडे पहातांना प्रत्येक ठिकाणी त्याचे सौंदर्य दिसते. इतक्या चांगल्याप्रकारे हे नुतनीकरणाचे काम करण्यात आले आहे. मला या दालनाच्या उदघाटनप्रसंगी उपस्थित रहाता आलं हा माझ्यासाठी सार्थकतेचा क्षण आहे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com