राष्ट्रध्वजाची संहिता तुम्हास माहीत आहे का ?

jalgaon-digital
5 Min Read

देशात विविध प्रसंगी निरनिराळ्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारतात. राष्ट्रध्वज लावण्याची योग्य पद्धत कोणती याविषयी संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. यामुळे यासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी दिलेल्या संहिता एकत्र केल्या आहेत.

भारतीय मानक संस्थेने (इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट) ठरवून दिलेल्या प्रमाणानुसार तयार केलेला आणि त्या संस्थेचे प्रमाणचिन्ह असलेला राष्ट्रध्वजच वापरण्यात यावा. इतर प्रसंगीसुद्धा केवळ अशाच प्रकारचे योग्य आकाराचे ध्वज लावले जाणे इष्ट आहे.

आकार काय हवा

राष्ट्रध्वजाचे प्रमाणिक आकार (मि.मी.)

1) 6.300 X4,200

2) 3,600X 2,400

3) 2,700 X 1,800

4) 1,800X 1,200

5) 1,350X900

6) 900 X 600

7) 450X 300

8) 225 X 150

9) 150 X 100

अशी करा ध्वजाची निवड

प्रसंगाच्या महत्त्वानुसार योग्य त्या आकाराचा ध्वज निवडण्यात यावा.

450X300मि.मी. आकाराचा ध्वज अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या विमानावर, 225 X150 मि.मी. आकाराचा मोटारींवर आणि लहान आकाराचा ध्वज (15X100 मि.मी.) टेबलावर लावण्यासाठी असतो.

ध्वज लावण्याची योग्य पद्धत

1) ज्या ज्या ठिकाणी ध्वज उभारतात अशा प्रत्येक ठिकाणी तो उच्च स्थानी आणि स्पष्टपणे दिसेल अशा रीतीने लावला पाहिजे.

2) जेथे कोणत्याही सरकारी इमारतींवर ध्वज लावण्याची प्रथा आहे. तेथे त्या इमारतींवर रविवार व सुट्टीचे दिवस धरून सर्व दिवशी ध्वज लावण्यात येईल. हवामान कसेही असले तरी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ध्वज लावण्यात येईल.

3) ध्वजारोहणाचे वेळी ध्वज नेहमी झर्रकन वर चढवावा आणि उतरवितांना मात्र तो सावकाशपणे व विधीपूर्वक उतरविण्यात यावा. ध्वजारोहण व ध्वजावतरण जेव्हा बिगुलच्या प्रसंगोचित सुरांवर करावयाचे असेल अशावेळी ध्वज चढविण्याची आणि उतरविण्याची क्रिया त्या सुरांच्या बरोबरच झाली पाहिजे.

4) जेव्हा खिडकीची कड, सज्जा अगर इमारतीचा पुढील भाग अशा ठिकाणी आडव्या किंवा तिरक्या बसविलेल्या काठीवरून ध्वज फडकविण्यात येतो तेव्हा ध्वजाची केशरी रंगाची बाजू काठीच्या वरच्या टोकाकडे असावी.

5) जर ध्वज इतर प्रकारे म्हणजे भिंतीवर सपाट व आडवा लावण्यात आला असेल तर ध्वजातील केशरी रंगाचा पट्टा सर्वातवर असावा. जर ध्वज उभा लावण्यात आला असेल तर ध्वजाची केशरी रंगाची बाजू त्याच्या (ध्वजाच्या) उजव्या बाजूस असावी.

6) पूर्व-पश्चिम अगर दक्षिणोत्तर जाणाऱ्या रस्त्याच्या मध्यभागी ध्वज लावतांना तो उभा लावावा व त्याची केशरी रंगाचू बाजू पूर्व-पश्चिम रस्त्यावर उत्तरेकडे आणि दक्षिणोत्तर रस्त्यावर पूर्वेकडे असावी.

7) एखाद्या व्यासपीठावर ध्वज लावावयाचा असेल तेव्हा वक्त्याचे तोंड श्रोत्यांकडे असतांना त्यांच्या उजवीकडे काठीवर ध्वज लावण्यात यावा. अथवा वक्त्याच्या पाठीमागे लावतांना तो भिंतीवर वक्त्याच्या वरच्या बाजूस लावावा.

8) पुतळ्याच्या अनावरणासारख्या प्रसंगी ध्वज लावतांना तो स्पष्ट दिसेल अशा वेगळ्या जागी लावण्यात यावा.

9) ध्वज मोटारीवर लावावयाचा असेल तर तो मोटारीच्या पुढे बॉनेटच्या मध्यावर मजबूतपणे बसवलेल्या सळईवर लावण्यात आला.

10) मिरवणुकीत अथवा संचलनाच्या वेळी ध्वज फडकत न्यावयाचा असेल तर तो चालणार्‍यांच्या उजव्या म्हणजेच खुद्द ध्वजाच्या उजव्या बाजूस असावा. अगर अशा प्रसंगी इतर आणखी ध्वजाची रांग असेल तर तो त्या रांगेच्या मध्यभागी पुढे ठेवावा.

हे करु नका

1) फाटलेला अथवा चुरगळलेला ध्वज लावता कामा नये.

2) एखाद्या व्यक्तीस अगर वस्तूस मानवंदना करण्यासाठी ध्वज खाली आणू नये.

3) दुसरा कोणताही ध्वज अगर पताका राष्ट्रध्वजाच्या वरच्या बाजूस अगर राष्ट्रध्वजावर आणि पुढे नमूद केलेले काही अपवाद सोडल्यास त्याच्या बरोबरीने लावू नये. तसेच ध्वज ज्या काठीवर फडकत असेल त्या काठीवर किंवा त्या काठीच्या वरच्या टोकावर फुले किंवा हार घालू नयेत. अथवा ध्येयचिन्ह लावू नये.

4) तोरण, गुच्छ अथवा पताका म्हणून किंवा शोभेसाठी ध्वजाचा कोणत्याही प्रकारे उपयोग करू नये. त्याचप्रमाणे इतर रंगीत कापडाचे तुकडे राष्ट्रध्वजासारखे दिसतील अशा पद्धतीने जोडू नये.

5) वक्त्याचे टेबल झाकण्यासाठी अथवा व्यासपीठावर आच्छादन वा पडदा म्हणून राष्ट्रध्वजाचा वापर करू नये.

6) केशरी रंगाचा पट्टा खाली येईल अशा रीतीने ध्वज लावू नये.

7) ध्वजाचा स्पर्श जमिनीस होऊ देऊ नये अथवा तो पाण्यावरून फरफटत नेऊ नये.

8) ध्वज फाटेल अशा पद्धतीने फडकवू नये अथवा बांधू नये.

ही काळजी घ्याच

1) ध्वजाचा कोणत्याही स्वरुपात आच्छादन म्हणून वापर करता कामा नये. सरकारमार्फत अथवा सेनादलांमार्फत तसेच केंद्रीय निमलष्करी दलामार्फत काढण्यात येणार्‍या अंत्ययात्रांचे प्रसंग यास अपवाद असतील असे प्रसंग पुढे दिले आहेत.

2) वाहन अथवा रेल्वेगाडी अगर जहाज यांच्या झडपांवर, छतांवर, बाजूंवर अथवा पाठीमागच्या बाजूस आच्छादन म्हणून ध्वजाचा वापर करू नये.

3) ध्वज फाटेल किंवा तो मलिन होईल अशाप्रकारे वापरू नये किंवा ठेवू नये.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *