
सिन्नर । वार्ताहर Sinnar
येथील वावी वेस परिसरातून गुरुवारी (दि. 5) सायंकाळी अपहरण झालेला 12 वर्षीय मुलगा सुखरूप घरी परतला असून मध्यरात्री 1.30 च्या सुमारास स्वत: अपहरणकर्त्यांनी या मुलाला घराजवळ आणून सोडले. यानंतर आज (दि.6) पोलिसांनी तपास यंत्रणा कामी लावून अपहरणकर्त्यांचा शोध लावत तिघांना अटक केली आहे.
कांद्याचे व्यापारी असलेले तुषार कलंत्री यांचा मुलगा चिराग सायंकाळी 7 च्या सुमारास मित्रांसोबत काळे वाड्यासमोरील बोळीमध्ये खेळत असताना सफेद रंगाच्या ओम्नी कारमधून आलेल्या तिघांनी त्याचे अपहरण केले होते. त्यानंतर मुलाच्या आईच्या मोबाईलवर अपहरणकर्त्यांनी फोन करून खंडणी मागितल्याने कुटुंबीय घाबरून गेले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे, पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांनीही तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर संपूर्ण जिल्हाभरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती.
पोलिसांनी आपली पथके रवाना करत त्याचा शोध सुरू केला होता. गुन्हे शाखेतील विनोद टिळे यांनी मुलाच्या आईला ज्या क्रमांकावरून फोन आला होता त्याचा तपास काढला असता तो फोन संगमनेर येथील असल्याची खात्री झाली. त्यांनी तत्काळ संगमनेरला रवाना होत पोलीस मित्रांच्या मदतीने मोबाईलधारकास ताब्यात घेत सिन्नर पोलीस ठाण्यात आणले. मात्र त्याचा मोबाईल एक वर्षापूर्वी माळेगाव एमआयडीसी येथून चोरीला गेल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून काही उपयुक्त माहिती काढत त्या मोबाईलवर शहरातील एका लॅण्डलाईन क्रमांकावरून संपर्क झाल्याचे दिसून आले.
पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याआधारे संशयितांची छबी स्पष्ट केली. त्यावरून तो संशयित कानडी मळा येथे राहत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या घरी शोध घेतला असता ते घरी मिळून न आल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. ही माहिती अपहरणकर्त्यांना कळाली असता त्यांनी मुलास मध्यरात्री त्याच्या राहत्या घराजवळ आणून सोडून दिले. मात्र आज (दि.6) पहाटेच्या सुमारास पोलिसांनी आरोपींचा माग काढत रोशन नंदू चव्हाण (23) व यश संदीप मोरे (22, दोघेही रा. कानडी मळा) यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी साथीदार आकाश भास्कर दराडे (रा. खोपडी) याच्यासोबत अपहरण केल्याची कबुली दिली. मुलाचे वडील शहरातील मोठे व्यापारी असून त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे. त्यांच्या मुलाचे अपहरण केल्यास आपल्याला पाच-दहा लाख रुपये आरामात मिळून जातील असा विचार करून आरोपींनी मुलाच्या दैनंदिन हालचालींवर लक्ष ठेऊन अपहरणासाठी सायंकाळची वेळ निश्चित केली.
त्यांच्याकडील नंबर प्लेट नसलेल्या ओम्नी कारने मुलाच्या घराबाहेर येऊन बराच वेळ टेहळणी केली व संधी मिळताच कारमध्ये बसवून तेथून पळ काढल्याची गुन्हेगारांनी कबुली दिली. यासाठी सिन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक निरीक्षक विजय माळी, उपनिरीक्षक सुदर्शन आवारी, रामदास धुमाळ, हरिश्चंद्र गोसावी, मिलिंद इंगळे, हवालदार रघुनाथ पगारे, नाईक शहाजी शिंदे, समाधान बोराडे, राहुल निरगुडे, चेतन मोरे, पंकज देवकाते, हेमंत तांबडे, रवींद्र चिने, किरण पवार, अंकुश दराडे, कृष्णा कोकाटे, गौरव सानप, सुशील साळवे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कामगिरी करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांच्याकडून तपास पथकास 15 हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले.
भावाला पळवण्याचा होता बेत
मुलाचे अपहरण करण्यासाठी आरोपींनी काही दिवसांपूर्वी 34 हजारांची ओम्नी कार शहरातून खरेदी केली होती. आरोपींनी सुरुवातीला व्यापार्याच्या लहान मुलाला पळवण्याचा बेत केला होता. बरेच दिवस त्यांनी त्याच्यावर पाळतही ठेवली होती. मात्र तो आरडाओरड करेल या भीतीने त्यांनी तो बेत रद्द करून मोठ्या मुलाचे अपहरण करण्याचे ठरवले. मुलाचा शाळेत जाण्याच्या, खेळण्याच्या वेळेवर आरोपींनी पाळत ठेवली. त्यानंतर संधी मिळताच त्याचे अपहरण केल्याची कबुली आरोपींनी दिली.
घाबरून सोडले घरी
अपहरणकर्त्यांनी चिरागला कारमध्ये टाकून शिर्डी महामार्गाने खोपडी परिसरात नेल्याचे स्वःत चिरागने सांगितले. त्यानंतर तेथून दोघांनी चिरागला बारागाव पिंप्री शिवारात नेले. तेथे जाऊन चिरागला त्यांनी पिण्यासाठी पाणी देऊन त्यास जॅकेट घालण्यास देऊन दुचाकीवरून चिरागला मध्यरात्रीच्या सुमारास सिन्नर पोस्ट ऑफिसजवळ आणून सोडले. घाबरलेल्या चिरागने घरी येत घडलेला सर्व प्रकार कथन केला. अपहरण झाल्यानंतर सोशल माध्यमांसह प्रसार माध्यमांनी व्यापक स्वरुपात वृत्त प्रसारित केले. तालुक्यातील प्रत्येकाच्या व्हॉटस्अॅपवर ही बातमी वार्यासारखी परसली. व्यापक स्वरुपात सर्वच माध्यमांवर घटनेची माहिती प्रसारित होत होती. प्रत्येक नागरिक आपापल्या स्टेटसवर मुलाचा फोटो ठेवत होते. त्यानंतर पोलीस पथकेही सर्वच मार्गांवर रवाना झाले होते. आरोपींना याची जाणीव झाल्याने त्यांनी घाबरुन मुलाला मध्यरात्री सुखरूप त्याच्या घराजवळ आणून सोडले.