खरिपाच्या पेरण्या रखडल्या

जिल्ह्यात अवघ्या 8.89 तर विभागात 19.89 टक्के
खरिपाच्या पेरण्या रखडल्या

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पावसाळा ( Rainy Season )सुरु होऊन 20-21 दिवसांचा कालावधी लोटला असून अद्याप अनेक भागात पेरणीसाठी समाधानकारक पाऊस ( Rain) झालेला नाही.त्यामुळे जून महिना संपत आला असून देखील जिल्ह्यात अवघ्या 8.89 टक्के तर नाशिक विभागात केवळ 19.89 टक्के इतक्या खरिपाच्या पेरण्या( Kharif Sowing ) झाल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात खरिपाचे उद्दिष्ट 6 लाख 65 हजार 582.20 हेक्टर तर विभागात 21 लाख 91 हजार इतके ठेवण्यात आले.

जूनमधील मृग नक्षत्र संपून सध्या आर्द्रा नक्षत्र सुरू असून जिल्ह्यात ठिकठिकाणी चांगला पाऊस होत आहे. यामुळे पेरण्यांना वेग आला असला तरी उशिरा आलेल्या पावसामुळे पेरण्यांना उशीर झाला आहे.28 जूनपर्यंत जिल्ह्यात खरिपाच्या अवघ्या साडेआठ टक्के पेरण्या झाल्या आहेत. मागील वर्षी जूनमध्ये 15 टक्के पेरण्या झाल्या होत्या. मागील वर्षी जून महिन्यामध्ये कमी पाऊस होऊनही महिन्याच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्यामुळे पेरण्या सुरू झाल्या होत्या.

जिल्ह्यात मका व बाजरी पिकाला शेतकर्‍यांकडून प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र आहे. पेरण्यांना सध्या वेग आला असला तरी अद्याप सर्वदूर समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे सोयाबीनच्या पेरण्यांना पाहिजे तसा वेग आल्याचे दिसत नाही.यावर्षी अन्नधान्य पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र 5 लाख 30 हजार 488 सर्वसाधारण क्षेत्र निश्चित केले असून त्यापैकी 46 हजार 133 हेक्टर क्षेत्रावर म्हणजे 8.70 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. त्यात मकाच्या 17 टक्के पेरण्या झाल्या आहेत. मकाचे दोन लाख 9 हजार 497 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून 35641 हेक्टरवर पेरण्यात झाल्या आहेत. या शिवाय कडधान्याची 3.28 टक्के म्हणजे 2779 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. तेलबियांची 1161 हेक्टर म्हणजे केवळ एक टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.

पावसाला जोर नाही

जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाचा मुक्काम कायम असला तरी त्याला फारसा जोर नाही. रोज पाऊस भरुन येतो तुरळक हजेरी लावतो पुन्हा विश्रांती घेतो. आज नाशिकमध्ये दुपारी चांगला पाऊस होईल असे वातावरण होते. मात्र निराशा झाली. दिवसभर बहुतांश भागात ढगाळ वातावरण होते. पावसाळी वातावरणानेे गारवा निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात पेरण्यांना आता वेग येऊ लागला आहे. खते बियाणे खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. जून संपत आला तरी पावसाने जोर न धरल्याने जिल्ह्यातील धरणसाठा 23 टक्क्यांंवर आला आहे. काल जिल्ह्यात सरासरी अवघा 12 मिलीमीटर पाऊस झाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com