
बंगळुरू | Bengaluru
कर्नाटक विधानसभा मतदानाला (Karnatak Election) आज (१० मे) सकाळी ७ वाजता सुरूवात झाली असून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सर्व २२४ मतदार संघासाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक कर्मचारी नियोजित मतदान केंद्रावर मंगळवारीच पोहचले होते.
एकूण २,६१५ उमेदवारांचे राजकीय भविष्य ५.३१ कोटी मतदार या विधानसभा निवडणुकीत ठरणार आहेत. काही मतदारसंघ संवेदनशील असल्यामुळे या निवडणुकीसाठी तब्बल दोन लाखांहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
कर्नाटकमधील विधानसभेच्या सर्व २२४ जागांसाठी आज मतदान होत आहे. निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. यावेळी निवडणूक लढविणाऱ्यांमध्ये अनेक मोठे नेते आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई स्वतः निवडणूक लढवत आहेत. याशिवाय, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, काँग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार, जेडीएस प्रमुख एचडी कुमारस्वामी, जगदीश शेट्टर, केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार, लक्ष्मण सवदी, रमेश जारकीहोळी, प्रियांका खर्गे, कृष्ण बैरेगौडा, रमेशकुमार यांच्यासह अनेक दिग्गज रिंगणात आहेत
तर माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा पहिल्यादांच निवडणुकीच्या रिंगणात नाहीत, तर भाजपचे अनेक बंडखोर नेते पक्ष बदलून पहिल्यांदा रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून ते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी जोरदार प्रचार केला आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानात तब्बल २ कोटी ६७ लाख २८ हजार ०५३ पुरुष, २ कोटी ६४ लाख ०७४ महिला आणि ४ हजार ९२७ इतर मतदार आहेत. उमेदवारांमध्ये २ हजार ४३० पुरुष, १८४ महिला आणि एक उमेदवार तृतीयपंथी आहे. राज्यात ११ लाख ७१ हजार 558 तरुण मतदार आहेत, तर ५ लाख ७१ हजार २८१ शारीरिकदृष्ट्या अपंग मतदार आहेत. तर १२ लाख १५ हजार ९२० मतदार ८० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत.
या निवडणुकीत जातीचे राजकारण महत्त्वाचे मानले जात आहे. लिंगायत आणि वोक्कलिगा घटक महत्त्वाचा फॅक्टरआहे. लिंगायत समाजाचा प्रभाव ६७ जागांवर आणि वोक्कलिगा ४८ जागांवर आहे. तर ८२ जागांवर दलित मतदारांचे वर्चस्व आहे. या ८२ जागांवर दलित लोकसंख्या २३ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.