Monday, April 29, 2024
Homeमहाराष्ट्रकर्जत-जामखेडच्या एमआयडीसीसाठी आज बैठक; उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन

कर्जत-जामखेडच्या एमआयडीसीसाठी आज बैठक; उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन

मुंबई |प्रतिनिधी| Mumbai

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील एमआयडीसीसंदर्भात उद्या (मंगळवार) तातडीने बैठक घेण्यात येईल. तसेच विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपण्याच्या अगोदर यासंदर्भात अधिसूचना काढण्यात येईल, या उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या आश्वासनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी आपले आंदोलन मागे घेतले.

- Advertisement -

स्थानिक तरुणांचा रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी कर्जत-जामखेड मतदारसंघात एमआयडीसी व्हावी, या मागणीसाठी रोहित पवार गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करीत होते. यासंदर्भात उच्चसमितीची बैठकही झाली. या बैठकीत परवानगीही मिळाली. उद्योग मंत्री सामंत, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटून विनंतीही केली होती. अधिसूचना काढण्याबाबत यापूर्वीच्या दोन अधिवेशनातही आश्वासन देण्यात आले होते.

मात्र त्याची पूर्तता न झाल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रोहित पवार यांनी आज सकाळी विधिमंडळाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ भरपावसात आंदोलन सुरु केले. एमआयडीसीला मंजूरी मिळालीच पाहिजे, कर्जत-जामखेडच्या तरूणांना रोजगार मिळालाच पाहिजे…असे पोस्टर हातात धरत पवार यांनी आंदोलन आरंभले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंसह ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तसेच महाविकास आघाडीच्या आमदारांनी त्यांची भेटही घेतली. आंदोलनापूर्वी पवार यांनी उद्योग मंत्री व विधानसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहीले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत रोहित पवारांच्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील पायऱ्यांवर आंदोलन किंवा उपोषण करायचे नाही, असा निर्णय सभागृहाने एकमताने  घेतलेला आहे.

त्यानुसार पुतळ्याचे पावित्र्य जपण्यासाठी उपोषण अथवा आंदोलन करणे अयोग्य आहे, असे मत व्यक्त करत त्यांनी तेथे आंदोलनाला बसू नये, असे निर्देश दिले. राष्ट्रवादीतील इतर नेत्यांनी आणि राज्य सरकारने त्यांची समजूत घालावी. तसेच पवार यांनी सभागृहात येऊन आपले म्हणणे मांडावे, असे नार्वेकर म्हणाले. या निर्देशानंतर उदय सामंत यांनी रोहित पवार यांची भेट घेऊन त्यांना कर्जत-जामखेड एमआयडीसीच्या संदर्भात उद्या (२५ जुलै) बैठक घेण्याचे आश्वासन देत आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले.

अन्यथा मुंबईत आमरण उपोषण

माझ्या मतदारसंघात एमआयडीसी व्हावी आणि स्थानिक युवा वर्गाच्या रोजगारांच्या समस्या सुटाव्यात यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हक्कासाठी लढाई सुरु केली होती. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एमआयडीसीच्या अधिसूचनेबाबत उद्या तातडीने बैठक घेतली जाईल आणि पुढील काही दिवसांत एमआयडीसीसंदर्भात जी काही अंतिम प्रक्रिया आहे ती १०० टक्के पूर्ण होणार असा शब्द दिला आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले. महाराष्ट्राचे मंत्री म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवत हा प्रश्न सुटावा यासाठी आंदोलन मागे घेत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे उद्याची बैठक महत्वपूर्ण असून लवकरात लवकर अधिसूचना निघून एमआयडीसीची प्रक्रिया पूर्ण होईल, असा त्यांनी विश्वास आहे. मात्र, दिलेल्या आश्वासनाप्रमाणे झाले नाही तर मी एकटा नव्हे तर माझ्या मतदारसंघातील हजारो युवकी मुंबईत येऊन आमरण उपोषण करतील, असा इशाराही त्यांनी यावेळी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या