Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार करंजवण योजनेचे उद्घाटन - आ. कांदे

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार करंजवण योजनेचे उद्घाटन – आ. कांदे

मनमाड । प्रतिनिधी Manmad

पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी संपुष्टात येत असल्याने शहरासाठी वरदान ठरलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण पाणीपुरवठा योजनेचे ( Karanjvan Water Supply Scheme )मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde)यांच्या हस्ते येत्या 13 फेब्रुवारीस हजारो जनतेच्या उपस्थितीत उदघाटन केले जाणार आहे, अशी माहिती आ. सुहास कांदे (MLA Suhas Kande )यांनी दिली.

- Advertisement -

संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आ. कांदे यांनी करंजवण पाणीपुरवठा योजना उद्घाटन सोहळ्यास उद्योगमंत्री उदय सावंत, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, नाशिक पालकमंत्री दादा भुसे,आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट केले.

या कार्यक्रमास 32 हजार घरात निमंत्रण पत्रिका, मिठाई व कामाची माहिती असणारी पुस्तिका देण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीत मनमाडच्या जनतेला पाणी समस्या कायमस्वरूपी सोडविण्याचे वचन दिले होते ते पूर्ण होत असल्यामुळे मनापासून आनंद होत असल्याचे आ. कांदे यांनी यावेळी सांगितले.

करंजवण योजनेच्या कामाला सुरुवात झाली असून सुमारे 12 किमी पेक्षा जास्त काम झाले आहे वेळेवर ही योजना पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट करत आ. कांदे पुढे म्हणाले, पाणी समस्यासोबत औदयोगिक वसाहतीचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे. शहरालगत तब्बल पावणेआठशे एकरांवर ’एमआयडीसी’ उभारण्यात येणार आहे. येवला रस्त्यावरील वंजारवाडी शिवारातील शासकीय व खासगी अशा एकूण 775 एकरांवर ही औद्योगिक वसाहत उभी राहणार असून यासंदर्भात आपण दिलेल्या प्रस्तावास उद्योग मंत्रालयाने नुकतीच मंजुर दिली आहे. प्रस्तावावर आनुषंगिक पूर्तता झाल्यानंतर याबाबतचे आदेश काढले जातील.

मनमाड शहरात रेल्वे जंक्शन असूनही केवळ पाणी टंचाईमुळे येथे मोठे प्रकल्प उभे राहिले नाही शिवाय औद्योगिकदृष्ट्या शहराचा विकास झाला नसल्याने शहरात रोजगारासह अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.सर्व समस्याचे मूळ पाणी टंचाई असल्यामुळे ही समस्या मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न केले आणि त्याला यश मिळाले आहे.

मनमाड, नांदगाव शहरासोबत तालुक्यात मोठ्या प्रमाणात गोरगरीब, मजूर, कामगार आहेत. त्यांच्यासाठी दोन फिरते दवाखाने. दोन फिरते शासकीय कार्यालय सुरु केले जाणार आहे. त्यासाठी सुसज्ज अशी वाहने तयार कारण्यात आली असल्याची माहिती देत आ. कांदे पुढे म्हणाले, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारी नगर परिषदेची जुनी इमारत पाडून त्याठिकाणी सर्वसुविधा युक्त अशी नवीन इमारत उभारली जाणार आहे, स्टेडियमचे अर्धवट असलेल्या कामासाठी 5 कोटींचा निधी मंजूर झाला असून शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

नांदगावंला भव्य अशी शिवसृष्टी उभारली जाणार असून त्यासाठी 25 कोटींचा निधी मिळणार आहे. तालुक्यातील गरजूची डोळ्या सोबत इतर आरोग्य तपासणी करून सर्वाना मोफत चस्मे वाटप केले जाणार असल्याचे आ. कांदे यांनी सांगितले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे, माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे, सुनील हांडगे, संगीता बागुल, सौं.जगताप, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या