
नवी दिल्ली | New Delhi
राज्यातील सत्तासंघर्षावर (Power Struggle) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज सलग तिसऱ्या दिवशीही सुनावणी सुरू आहे. आजच्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Advocate Kapil Sibal) यांनी आक्रमक पवित्रा घेत राज्यपालांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत जोरदार युक्तिवाद (Argument) केला. तसेच युक्तिवादाच्या शेवटी सिब्बल यांनी भावनिक टिप्पणी देखील केली...
सुनावणीवेळी बोलताना सिब्बल म्हणाले की, "मी हरेन किंवा जिंकेन. मात्र, मी इथे फक्त या प्रकरणासाठी उभा नाही. मी इथे आपल्या सगळ्यांच्या हृदयाच्या जवळ असणाऱ्या एका गोष्टीसाठी उभा आहे. संस्थात्मक सार्वभौमत्व आणि राज्यघटनेची जपणूक करण्यासाठी मी इथे उभा आहे." असे म्हटले. तसेच "जर न्यायालयाने हा सगळा प्रकार वैध ठरवला, तर आपण १९५० सालापासून जी गोष्ट इतकी काळजीपूर्वक जपून ठेवली आहे, तिचा मृत्यू होईल," असं नमूद करत कपिल सिब्बल यांनी सूचक इशारा दिला.
तर पुढे राज्यपालांच्या कार्यपद्धतीवर बोलताना सिब्बल म्हणाले की, राज्यपालांकडे (Governor) गेलेल्या ३९ आमदारांनी (MLA) तेच शिवसेना आहेत हे कसं ठरवलं? राज्यपालांची संविधानिक नैतिकता काय आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच ते ३९ आमदार शिवसेनेचे आहेत की नाहीत याची खात्री राज्यपालांनी केली असती तर सरकार कोसळले नसते, त्यामुळे राज्यपालांनी केलेल्या कृत्यावर जरी निकाल दिला तरी सगळ्या प्रकरणाचा निकाल लागेल, असे सिब्बल यांनी म्हटले.
याशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या हंगामी आदेशामुळे झालेली चूक घटनापीठाने दुरूस्त करावी अशी मागणी वकील कपिल सिब्बल यांनी केली. तसेच १६ आमदारांच्या अपात्रतेचा (Disqualification)निर्णय विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ यांच्याकडे सोपवला जाऊ शकतो असंही सिब्बल म्हणाले. तर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हंगामी आदेश देत उपाध्यक्षांच्या अधिकारात हस्तक्षेप केला आहे. त्यानंतर राज्यातील सत्तासंघर्षात अनेक घडामोडी झाल्या, असे देखील सिब्बल यांनी म्हटले.