“महिलेचा अपमान करणाऱ्याला...” पक्ष आणि चिन्ह गेल्यावर उद्धव ठाकरेंवर कंगना रनौतचा निशाणा

“महिलेचा अपमान करणाऱ्याला...” पक्ष आणि चिन्ह गेल्यावर उद्धव ठाकरेंवर कंगना रनौतचा निशाणा

मुंबई | Mumbai

निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) हे नाव आणि पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि त्यांच्या गटाला दिलं आहे. शुक्रवारी संध्याकाळी हा निर्णय झाला. निवडणूक आयोगाचा हा निर्णय उद्धव ठाकरेंसाठी (Uddhav Thackeray) मोठा धक्का मानला जात आहे.

निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर सर्वच स्तरातून समिश्र प्रतिक्रिया पहायला मिळाल्या अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले तर अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली. अशातच अभिनेत्री कंगना रनौतने देखील उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

'वाईट वागल्यानंतर देवांच्या राजाला अर्थात इंद्रालादेखील त्याची शिक्षा मिळत असते. हा तर फक्त एक नेता आहे. ज्यावेळी त्यांनी माझं घर तोडलं, त्यावेळीच मला वाटलं होतं की यांचे वाईट दिवस आता सुरु होणार. एका स्त्रीचा अपमान करणाऱ्याला देव शिक्षा देतोच. तो आता कधीच उठणार नाही,' असे टि्वट कंगनाने केले आहे.

दरम्यान,उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेने (BMC) कंगनाचे मुंबईतील तिचे कार्यालय तोडले होते. या कार्यालयाच्या काही भागाचे अनाधिकृत बांधकाम असल्याचे सांगत महापालिकेने प्रशासनाने त्यावर हातोडा चालवला होता. त्यानंतर कंगनाने उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली होती.

यानंतर आज पुन्हा कंगनाने ट्विट करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. कंगनाने ट्विटमध्ये उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला नसला तरी कंगणाने एकूणच शिवसेना गमावल्यानंतर प्रतिक्रिया दिली असल्याचे दिसून येत आहे.

कंगना रनौतचा आगामी 'इमर्जन्सी' (Emergency) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात ती अभिनेत्री म्हणून झळकण्यासोबत दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com