Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यादेवळालीत साकारले 'कलापूर्णम तीर्थधाम'

देवळालीत साकारले ‘कलापूर्णम तीर्थधाम’

देवळाली कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

प्राचीन काळापासून नाशिकची ओळख देवभूमी असून त्यात देवळाली येथील गुजराती व जैन समाजाने अतिशय भव्यदिव्य असे मंदिरे उभारले आहेत. त्यात नव्याने उभारण्यात आलेल्या ‘कलापूर्णम’ ( Kalapurna Tirthadham)मंदिराचा होणार समावेश लाख मोलाचा ठरणार आहे.

- Advertisement -

मंदिरांची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवळालीच्या लॅमरोड परिसरात मोठे धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे. नाशिकच्या भोवताली केवळ हिंदूच नव्हे तर बुद्ध, पारसी, ख्रिस्ती धर्माबरोबर जैन धर्माची अनेक मंदिरें (देरासरे) आहेत. नाशिकच्या उजव्या कुशीत अगदी छोट्यामोठ्या डोंगररांगांमध्ये वसलेले देवळाली हे लष्करी तलामुळे संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे.

सर्वधर्मियांना सामावून घेतलेल्या या शहराला मिनी इंडिया संबोधले जाते. ब्रिटिशकाळापासून मुंबई व सुरत, राजकोटस्थित पारशी, जैन, गुजराथी समाजाचे व्यापारी बांधव या परिसरात दिवाळी, ख्रिसमस व उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये येथील आरोग्यधाममध्ये वास्तव्यासाठी येत असतात. या ठिकाणी वास्तव्यादरम्यान आपल्या आराध्य देवतेचे पूजन, धर्माचे संस्कार व आचरण पुढील पिढीवर व्हावे या उद्देशाने येथे लॅमरोड भागात जैन धर्मिंयानी विविध देरासरे (मंदिरे) साकारली आहे.

याच परंपरेत गेल्या सात वर्षांपासून येथे ‘कलापुर्णम तीर्थधाम’ नावाने 24 तीर्थकारांचे 30 हजार चौरस फुट जागेत साकारलेल्या या मंदिरात 81 बाय 81 चौरस फुटाचे बिनखांबी रंगमंडप असलेले हे देशातील पहिलेच मंदिर ठरणार आहे.

लॅमरोड भागात असणार्‍या विविध आरोग्यधाम या सर्वाधिक प्रमाणात जैन धर्मियांच्या आहे. येथील हिरवाईमुळे मुंबईतील व्यावसायिक आपल्या उतारवयात येथे स्थिरावण्यासाठी येतात. त्यामुळे त्यांचे वास्तव्य येथे वाढले आहे. येथे वास्तव्यादरम्यान मनात उत्पन्न होणार्‍या शुद्ध विचारांना चालना देण्यासाठी त्यांच्या आराध्य देवदेवतांची मंदिरे साकारण्यास सुरुवात झाली.

यामध्ये लॅमरोड भागातच कहान नगर, गौतमस्वामी, शांतीनाथ, महावीर स्वामी, मुनिसुव्रत दादा, श्रीमद राजचंद्र स्वाध्याय मंदिर, श्रीजी धाम, नंदनवन अशी मंदिरे यापूर्वी साकारलेली आहे. परंतु यापेक्षा भव्यदिव्य व वेगळे काहीतरी करण्याच्या उद्देशाने याच परंपरेत पुढे जात असताना मुंबईस्थित गुणोपासक परिवार ट्रस्ट यांनी जैन अध्यात्मयोगी संत आचार्य कलापुर्णमसुरीश्वरजी यांच्या आशीर्वादाने व प्रवचन प्रभावक आचार्यदेव श्री तत्वदर्शनसुरीश्वरजी महाराज यांच्या प्रेरणेने लॅमरोड भागातील बालगृह रोडवर तब्बल 60 हजार चौरस फूट जागेमध्ये दोनमजली भव्य असे तब्बल 1 लाख टन पेक्षा अधिक मखरांना संगमरवरी दगडात हे कलापुर्णम तीर्थधाम देरासर साकारत आहे. गेल्या सात वर्षांपासून 150 पेक्षा अधिक कारागीर या मंदिर निर्माण कार्यात अव्याहतपणे कार्यरत आहे.

या मंदिराचे वैशिष्ट्य जैन धर्माचे मुलनायक मुनिसुव्रत स्वामी यांचीभव्य मूर्ती मुख्य गाभार्‍यात असणार आहे. तर 360 अंशामध्ये उर्वरित 23 तीर्थकरांचे दर्शन होणार आहे. मंदिराच्या छतावर साकार करण्यात आलेल्या कलाकुसरीत एकही डिझाईन दुसर्‍यांदा वापरण्यात आलेली नाही. त्यासोबत आतदेखील संगमरवरी दगडावर कलाकुसर साकारलेली आहे.

पर्यटनाला चालना

या कलापुर्णम तीर्थधाममध्ये दर शनिवारी विशिष्ट पूजाविधी केली जाणार आहे. ही पूजाविधी करण्यासाठी येथे देशभरातून भाविक येणार आहे. या मंदिराचे निर्माण कार्य पूर्णत्वाकडे जात असून पुढील महिन्याच्या 3 मार्च रोजी विशिष्ट मुहूर्तावर या मंदिरात अंजनशलाका प्रतिष्ठा महामहोत्सव (प्राणप्रतिष्ठा) सोहळा होणार आहे. यानिमित्ताने फेब्रुवारी महिन्याचा शेवटच्या आठवड्यापासूनच विविध धार्मिक विधी व उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. देवळालीबरोबर नाशिकच्या धार्मिक पर्यटनाला चालना देणारे हे जैन देरासर ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या