“मी अस्वस्थ आहे... माफ करा, मी कुणालाही..."; वाढदिवसाच्या दिवशीच ट्विट करून जितेंद्र आव्हाड अज्ञातस्थळी

“मी अस्वस्थ आहे... माफ करा, मी कुणालाही..."; वाढदिवसाच्या दिवशीच ट्विट करून जितेंद्र आव्हाड अज्ञातस्थळी

मुंबई । Mumbai

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांचा आज वाढदिवस. आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षी ठाणे आणि मुंब्रा परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सकाळपासूनच त्यांचे चाहते, हितचिंतक आणि कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी येत असतात. पण यंदा जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)वाढदिवस साजरा करणार नाहीत. आव्हाड (Jitendra Awhad)यांनी ट्विट करून त्याबाबतची माहिती दिली आहे.

आव्हाड नेमकं काय म्हणालेत?

उद्या 5 ऑगस्ट... माझा वाढदिवस. लोक अत्यंत उत्साहाने मला भेटायला येतात, शुभेच्छा देतात. मनापासून आपल्या भावना व्यक्त करतात. ते अत्यंत हृदयस्पर्शी असतं. वर्षभराची ताकत 5 तारखेला मिळते. पण मला माफ करा. ह्या 5 तारखेला मी कोणालाही भेटणार नाही आणि वाढदिवसही साजरा करणार नाही.

देशात होणारी लोकशाहीची हत्या, महाराष्ट्रात होणारी पक्षफुटी, मणिपूरमध्ये झालेला स्त्रियांवरील अत्याचार, महाराष्ट्रामध्ये वाढलेले दलित आणि मागासवर्गीयांवरील अत्याचार. हे सगळं बघितल्यानंतर राजकारणाची घसरलेली पत ही अत्यंत अस्वस्थ करणारी आहे. मी स्वतःही अस्वस्थ आहे. त्यामुळे या अस्वस्थ अवस्थेत आपण कोणाला भेटावं असे मला अजिबात वाटत नाही.

तुमच्या शुभेच्छा आहेत, तुमचे शुभाशीर्वाद आहेत. हीच माझी ताकत आहे. हीच माझी संपत्ती आहे. पण तरिही मला माफ करा. मी आज रात्री बारापासून ते उद्या रात्री बारापर्यंत स्वतःचा फोन बंद करून मी अज्ञातस्थळी जाणार आहे. अत्यंत अस्वस्थ मनाने मी हे लिहीत आहे.

लोक किती स्वार्थी असतात हे माझ्या उघडपणाने लक्षात आलं. स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाच्याही मानेवर पाय देऊ शकतात. ज्यांना पोसलंय तेच कृतघ्न होतात. हा अनुभव मला नवीन आहे. आणि हे सगळं बघितल्यानंतर अस्वस्थ मनाने मी कोणालाच भेटू इच्छित नाही. कृपया माफ करा. मी उद्या वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

जितेंद्र आव्हाड

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com