जिंदाल कंपनी आग दुर्घटना : सात जणांविरुध्द गुन्हा दाखल

जिंदाल कंपनी आग दुर्घटना : सात जणांविरुध्द गुन्हा दाखल

घोटी |जाकीर शेख Ghoti

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी १ जानेवारीला इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीमध्ये( Jindal Polyfilm Company) मोठ्या स्वरुपात आग (Fire )लागली होती. ह्या घटनेमध्ये ३ कामगार महिमा कुमारी प्रल्हाद सिंग, अंजली रामकुबेर यादव, सुधीर लालताप्रसाद मिश्रा यांचा मृत्यु झाला होता. ह्या दुर्घटनेत २२ कामगार जखमी झाले होते. घोटी पोलीस ठाण्यात ह्या घटनेबाबत अकस्मात मृत्यु व अकस्मात जळीत दाखल करण्यात आले होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

या घटनेतील अकस्मात जळीताची चौकशी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर हे करीत होते. अकस्मात जळीताच्या चौकशीचे अनुषंगाने औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग, नाशिक व संबधित विभागांना पत्रव्यवहार करुन अहवाल मागविण्यात आले होते. त्याचबरोबर कंपनीचे सेफ्टी ऑडीट रिपोर्ट व इतर कागदपत्रे प्राप्त करण्यात आली होती.

सर्व कागदपत्रांचे अवलोकन करता, ज्या बॅच पॉलिफिल्म प्लॅन्टमध्ये प्रथमतः आग लागली होती, तो बॅच पॉलिफिल्म प्लॅन्ट हा सुमारे दीड महिन्यांपासुन बंद होता. सदर प्लॅन्ट सुरु करण्यापुर्वी त्याची तपासणी व दुरुस्ती होवुन, तो सुरु करताना SOP चे पालन न केल्याने, प्लॅन्टमधून थर्मिक फ्लुईड ऑइलची गळती होवुन मोठा स्फोट होऊन आग लागल्याचे निष्पन्न झाले आहे. या बाबत विरोधी पक्षनेते आंबादास दानवे(Raosaheb Danve ) यांनी सोमवार दि. २० रोजी या कंपनीतील आग लागलेल्या घटनास्थळाची पाहणी केली होती. तसेच आत्तापर्यंत गुन्हा कसा दाखल करण्यात आला नाही याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

या आगीत १ पुरुष व २ महिला कामगार यांचे मृत्यूस व कंपनीचे इतर २२ कामगारांच्या दुखापतीस जिंदाल पॉलिफिल्म प्रा. लि. कंपनीचे भोगवटादार, फॅक्टरी मॅनेजर, पॉली फिल्म प्लॅन्ट बिजनेस हेड, प्रोडक्शन मॅनेजर, मेन्टेन्सस विभाग प्रमुख, प्रोडक्शन डिपार्टमेंट शिफ्ट इंचार्ज आणि प्लॅन्ट ऑपरेटर हे ७ इसम जबाबदार आहे. म्हणून त्यांच्या विरुध्द घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार घोटी पोलीस स्टेशन( Ghoti Police Station) येथे गुरनं. ८५ / २०२३ भादवि कलम ३०४(अ), ३३७, ३३८, २८५, २८७, ३४ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. ह्या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, नाशिक ग्रामीण अर्जुन भोसले हे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com