'जेईई मेन'चा तिढा काही सुटेना; तारखांचे परिपत्रक मागे

जेईई मेन
जेईई मेन

नाशिक | प्रतिनिधी

आयआयटीमधील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी घेतल्या जाणार्‍या जेईई परीक्षेच्या 2021 मधील तारखांची घोषणा मंगळवारी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने केली. मात्र, सायंकाळी उशिरा हे परिपत्रक एनटीएने मागे घेतले आहे. 15 डिसेंबरपासून या परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू होणार होती, त्यासंबंधीचे परिपत्रकही मागे घेण्यात आले आहे.

जोपर्यंत शिक्षण मंत्रालयाचा निर्णय जाहीर होत नाही, तोपर्यंत जेईई मेनच्या तारखा निश्चित सांगता येणार नाहीत. मात्र, जेईईचं हे परिपत्रक तूर्त मागे घेण्यात आले असले तरी त्यातली माहिती थोड्याफार फरकाने सारखीच राहिल असे म्हटले जात आहे.

जेईई मेन एकाहून अधिक सत्रांमध्ये आयोजित करण्यात येईल, हे त्या परिपत्रकातून स्पष्ट झाले होते. शिवाय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनीही अलीकडेच एका वेबिनारमधून जेईई मेन दोनपेक्षा अधिक सत्रात घेण्याचा सरकारचा मानस बोलून दाखवला होता.

विविध राज्यांच्या बारावी बोर्ड परीक्षांच्या आयोजनाबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे त्या परीक्षा जेईई मेनशी क्लॅश होऊ नयेत यासाठी जेईईची सत्रे वाढवली जाण्याची शक्यता आहे.

मंगळवारी जारी करून नंतर मागे घेतलेल्या परिपत्रकातून जेईई मेन परीक्षेच्या पॅटर्नमधील बदलही पुढे आला होता.

त्यानुसार, प्रत्येक विषयात यंदा 30 ऐवजी 25 प्रश्न असणार असल्याची माहिती मिळत होती. जेईई मेन 2021 परीक्षेच्या तारखा कदाचित नव्याने जाहीर केल्या जातील, मात्र अन्य माहिती जैसे थे राहण्याची शक्यता आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com