प्रणवदांच्या पुस्तकात दावा : नेहरुंनी फेटाळली होती नेपाळची भारतात सामावेशाची ऑफर

मोदींनी सर्जिकल स्ट्राईकचा अतिप्रचार केला
प्रणवदांच्या पुस्तकात दावा : नेहरुंनी फेटाळली होती नेपाळची भारतात  सामावेशाची ऑफर

नवी दिल्ली

भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत जवाहरलाल नेहरु यांनी नेपाळचा राजा त्रिभुवन बीर बिक्रम शाह याने नेपाळला भारतात सामावून घेण्याची ऑफर फेटाळली होती. जवाहरलाल नेहरुंच्या जागी इंदिरा गांधी असत्या तर नेपाळ भारतात असता, असा दावा भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणब मुखर्जी यांच्या ‘द प्रेसिडेन्शियल इयर्स’ या आत्मचरित्रात करण्यात आला आहे. या पुस्तकात मुखर्जी यांनी विविध मुद्द्यांवरील आपली मते व्यक्त केली आहेत. या पुस्तकातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीचं परराष्ट्र धोरण, पाकिस्तानसोबत भारताची सहकार्य मोहीम याचाही उहापोह केला आहे.

मोदी सरकारने सन २०१६ मध्ये पाकिस्तानविरोधात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अतिप्रचार केला. पाकिस्तानकडून सातत्याने आक्रमक भूमिका अबलंबली जात असताना त्यांना उत्तर देण्यासाठी भारताकडून प्रत्यक्ष सीमा रेषा ओलांडून अनेकदा अशा कारवाया करण्यात आल्या आहेत. हा एक सर्वसाधाराण लष्करी मोहिमेचा भाग आहे. मात्र, या मोहिमेचा मोदींनी अतिप्रचार केला तसेच यावर गरजेपेक्षा जास्त बोलून आपल्या हाती काहीही लागले नाही. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वाढदिवसानिमित्त मोदींनी लाहोरला दिलेल्या सरप्राईज भेटीबद्दलही माजी राष्ट्रपती मुखर्जी यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे. भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये प्रचलित असलेल्या अटींनुसार मोदींची ही भेट अनावश्यक होती असे मुखर्जी यांनी म्हटलं आहे.

इंदिरा गांधी असत्या तर नेपाळ भारतात असते

नेपाळमध्ये राणा राजवटीची जागा राजेशाहीने घेतल्यानंतर तिथे लोकशाही रुजावी अशी इच्छा होती. महत्वाचे म्हणजे नेपाळचा राजा त्रिभुवन बीर बिक्रम शाह याने नेहरुंना नेपाळला भारतात समाविष्ट करुन घेण्यासंबंधी सुचवले होते. पण नेहरु यांनी नेपाळ एक स्वतंत्र देश असून तो तसाच राहिला पाहिजे सांगत ही ऑफर फेटाळली होती. तेव्हा पंडित नेहरूंच्या जागी इंदिरा गांधी असत्या, तर कदाचित त्यांनी संधीचा फायदा घेतला असता. सिक्कीमबाबत त्यांनी तसे केलेही होते.

प्रत्येक पंतप्रधानाची शैली वेगळी

प्रणव मुखर्जी यांनी पुस्तकात माजी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींबद्दल आपले मत व्यक्त करताना म्हटले आहे की, प्रत्येक पंतप्रधानाची काम करण्याची एक वेगळी शैली होती. लाल बहादूर शास्त्री यांनी पंडित जवाहरलाल नेहरुंपेक्षा वेगळ्या भूमिका घेतल्या. एकाच पक्षातील असले तरी परराष्ट्र धोरण, सुरक्षा आणि अंतर्गत प्रशासन याबाबतीत पंतप्रधानांमध्ये मतभिन्नता असू शकते.

मोदींची कार्यशैली हुकुमशाह सारखी

मोदी सरकारच्या अनेक निर्णयांकडे मुखर्जी यांनी अत्यंत बारकाईने पाहिले आहे आणि त्यावर टीकाही केली आहे. त्यांनी आपल्या या पुस्तकात, मोदी सरकार आपल्या पहिल्या कार्यकाळात प्राथमिक जबाबदाऱ्याही व्यवस्थितपणे पार पाडू शकले नाही. तसेच संसदेचे कामकाजही व्यवस्थितपणे पार पडू शकले नाही, असे म्हटले आहे. पहिल्या कार्यकाळात मोदींची कार्यशैली एखाद्या हुकुमशाह सारखी होते. नोटाबंदी करण्यापूर्वी आपल्याकडून कुठल्याही प्रकारचा सल्ला घेण्यात आला नव्हता. मोदी सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर आपल्याला समर्थन मागितले, असेही मुखर्जी यांनी या पुस्तकात म्हटले आहे.

काँग्रेसमधील जादुई नेतृत्व संपलेय

प्रणव लिहितात, ‘मी राष्ट्रपती झाल्यानंतर काँग्रेसने राजकीय फोकस गमावला. आपले जादुई नेतृत्व संपलेय, हे पक्षाला कळलेच नाही. २०१४ मधील पराभवाचे हेही एक कारण असावे. या निकालांमुळे किमान निर्णायक जनादेश आला, ही मला दिलासादायक बाब वाटली. मात्र माझा पक्ष असलेल्या काँग्रेसच्या कामगिरीने निराश झालो.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com