नाशिक मध्ये आजपासून जनता कर्फ्यू

सहभागी व्हा; सिटीझन फोरमचे आवाहन
नाशिक मध्ये आजपासून जनता कर्फ्यू

सातपूर । प्रतिनिधी

नाशिकमध्ये करोनाला बराच काळ थोपवून धरण्यात आपण यशस्वी ठरलो. यावेळी मात्र परिस्थिती वेगळी आहे. ती सुधारण्यासाठी नाशिकमधील विविध राजकीय, सामाजिक, व्यावसायिक, व्यापार, उद्योग संघटनांनी स्वयंस्फूर्तीने पुढे यावे. आज सोमवारपासून पुढील दहा दिवस नाशिक शहरात जनता संचारबंदी (जनता कर्फ्यू) पाळण्यात येत आहे. करोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात आणण्यास मदत करावी, असे आवाहन नाशिक सिटीझन फोरमचे अध्यक्ष हेमंत राठी यांनी केले आहे.

करोनावरील उपचारांसाठी आवश्यक असलेली इंजेक्शन्स, औषधे, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर खाटा यांचा नाशिकमध्ये तुटवडा निर्माण झाला आहे. त्यावर मात करण्यासाठी शासन-प्रशासन-पोलीस आपापल्या पातळीवर सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेच, पण त्यांना त्यांच्या नैमित्तिक प्रशासकीय जबाबदार्‍याही पार पाडायच्या आहेत.

शासन-प्रशासन-पोलीस आणि आरोग्य सेवा देणारे सर्वच जण वर्षभरापासून कामाचा मोठा ताण सहन करीत आहेत. बाधितांना सेवा पुरवणे आणि मनुष्यहानी कमी करणे ही त्यांच्यापुढील सर्वोच्च प्राधान्याची कामे आणि आव्हान आहे. अशावेळी संसर्ग होण्यास अटकाव करण्याची जबाबदारीही सर्वच राजकीय, सामाजिक, व्यावसायिक, व्यापार आणि औद्योगिक संघटनांनी स्वीकारणे गरजेचे आहे. त्यासाठी तातडीचा उपाय म्हणून सर्वांनीच पुढील दहा दिवस नाशिक शहरात जनता संचारबंदी पाळावी. त्याची परिस्थिती नियंत्रणात आणण्यास नक्कीच मदत होईल, असे राठी यांनी म्हटले आहे.

नाशिक सिटीझन्स फोरमने जनता संचारबंदीची संकल्पना मांडल्यानंतर तिला विविध स्तरांमधून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. पालकमंत्री, महापौर आणि प्रशासनाकडून फोरमच्या भूमिकेचे स्वागत झाले आहे. महाराष्ट्र चेंबर्सनेदेखील याबाबत ऑनलाईन बैठकीत विविध संघटनांच्या सुमारे 60 प्रतिनिधींची मते जाणून घेतली. त्यात क्रेडाई, ट्रान्सपोर्ट असोसिएशन, हार्डवेअर अँड पेंटस् मर्चंट असोसिएशन आदी अनेक संघटनांनी या भूमिकेला दुजोरा दिला आहे.

भाजीपाला, दूध ठराविक वेळेत

आज सोमवारपासून सर्वांनी नाशिक शहरात स्वयंस्फूर्त जनता संचारबंदीत सहभागी व्हावे. अत्यावश्यक सेवा देणार्‍या भाजीपाला, फळे व दूध विक्रेत्यांनीदेखील फक्त सकाळी 7 ते 10 आणि किराणा दुकानदारांनी सकाळी 8 ते दुपारी 1 या वेळेत आपले व्यवसाय सुरू ठेवावेत, असे आवाहन नाशिक सिटीझन्स फोरमच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com