जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करणार

नैसर्गिक शेती राज्यस्तरीय परिषदेत फडणवीस यांची घोषणा
जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करणार

पुणे । प्रतिनिधी Pune

राज्यात जलयुक्त शिवार योजना ( Jalyukta Shivar Scheme ) पुन्हा नव्याने सुरू करणार, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy CM Devendra Fadnavis ) यांनी केली आहे. युती सरकारच्या काळातील या योजनेमुळे राज्यात 39 लाख हेक्टर ओलिताखाली आली असून, 27 टीएमसी पाणी आता साठवता येत आहे. त्यामुळे पुन्हा ही योजना सुरू करत प्रत्येक गाव जलयुक्त करू, असे फडणवीस म्हणाले.

पुण्यातील बालेवाडी स्टेडियम येथे नैसर्गिक शेती राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी ही घोषणा केली. फडणवीस म्हणाले, आपण पुन्हा जलयुक्त शिवार योजना सुरु करत असून आता प्रत्येक गाव जलयुक्त असेल.2025 पर्यंत दहा लाख हेक्टरवरील सेंद्रीय शेती 25 लाख हेक्टरपर्यंत नैसर्गिक शेतीखाली आणावी, असे लक्ष्य ठेवण्यात यावे. यावेळी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवरत, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारंपरिक पध्दतीने नैसर्गिक शेती कशाप्रकारे करता येईल.यादृष्टीने सन 2015-16 पासून विविध योजना सुरु करण्यात आली. राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना एकत्रित करुन शेतकर्‍यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि शेतकर्‍यांना सेंद्रिय शेतीकडे वळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनांद्वारे गावात वेगवेगळया कृषी आधारित योजना राबवल्याने जागतिक बँकेने

आपल्याला साडेचार हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य दिले. आता आणखी काही जिल्हे या योजनेत समाविष्ट करण्यात येतील. स्मार्ट प्रकल्पांतर्गत दहा हजार गावांत 2100 कोटी रुपये खर्च करुन शेतकर्‍यांच्या बाजारपेठ साखळीचे सक्षमीकरण करण्यात आले. शेतकर्‍यांना मुख्य अडचण आहे की, त्यांच्या मालास अपेक्षित भाव न मिळता मधील दलालांना अधिक भाव मिळतो. या साखळीमुळे शेतकर्‍यांना योग्य भाव मिळाल्यास ते समृध्द होतील.

नैसर्गिक शेती हा महत्वपूर्ण विषय आहे. पारंपरिक पध्दतीने चालणार्‍या आपल्या शेतीत विज्ञानाची जोड आहे. परंतु नंतरच्या काळात आपण मोठया प्रमाणात रासायनिक खते वापरण्यास सुरुवात केली. त्यामुळे शेतीची चक्रीय अर्थव्यवस्था बदलली गेली. शेतमालाचा भाव वाढला असला तरी देखील आपला उत्पादन खर्च वाढत असल्याने शेती तोट्यात जाते. वातावरण बदलाचा शेतीवर परिणाम होत असून अतिवृष्टीमुळे पीकांचे नुकसान होते असेही त्यांनी नमूद केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्रात साडेअकरा कोटी लोकसंख्या असून 52 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रीय शेतीवर आपण भर दिला पाहिजे. मात्र, सेंद्रिय शेती करताना त्याच्या मालाची किंमत जास्त ठेवता येणार नाही.त्यामुळे शेतकर्‍याकडून बाजारमूल्याने धान्य खरेदी करुन ते कमी किंमतीत लोकांना देण्यासाठी शासनाला काही आर्थिक पाठबळ द्यावे लागेल. सध्या सर्वांचे आरोग्य महत्वपूर्ण असून सामान्य माणसाच्या हिताकरिता सेंद्रीय शेतीचा माल उपलब्ध करुन देणे महत्वपूर्ण आहे.

लोकचळवळ उभी करावी

नैसर्गिक शेतीमुळे जलप्रदूषण होणार नाही, पर्यावरणाचे रक्षण होईल, पाण्याची बचत व जमिनीचा पोत चांगला राहील, गोधन वाचेल, नागरिकांचे आरोग्य चांगले राहील, देश आत्मनिर्भर बनून शेतकर्‍यालादेखील लाभ होईल. त्यामुळे देशात नैसर्गिक शेतीसाठी लोकचळवळ उभी करून प्रत्येक शेतकर्‍यापर्यंत त्याबाबतची माहिती पोहोचवावी, असे आवाहन गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी यावेळी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com