<p>मुंबई</p><p>जळगावातील आशादीप महिला शासकीय वसतीगृहामध्ये महिलांचे शोषण झाल्याचा आरोपाचे प्रकरण गुरुवारच्या दिवशीही सभागृहात गाजले. आज या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना क्लीन चीट दिली आहे. ज्या महिलेने तक्रार केली आहे, ती वेडसर असल्याची तक्रार याआधी समोर आल्याचं गृहमंत्री म्हणाले.</p>.<p>जळगावातील आशादीप महिला शासकीय वसतीगृहामध्ये मुलींना नग्न नाचवल्या प्रकरणावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये घमासान पाहण्यास मिळाले. बुधवारी भाजपकडून हे प्रकरण उपस्थि झाल्यावर अनिल देशमुख यांनी योग्य ती कारवाई केली जाईल, अशी घोषणा केली होती. त्यानंतर या प्रकरणी ६ अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली होती. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी निवेदन सादर केले. त्यांनी महिला अधिकाऱ्यांनी सादर केलेला अहवाल पटलावर मांडला. ज्या वसतीगृहामध्ये हा प्रकार घडला त्याठिकाणी ४१ महिलांची साक्ष नोंदवण्यात आली. दरम्यान या तक्रारीमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे गृहमंत्री म्हणाले. त्यांनी अशी माहिती दिली की, तिच्या पतीनेही याआधी त्या महिलेविरोधात तक्रार केली होती. शिवाय त्याठिकाणी पोलीस हजर असल्याचा आरोपही गृहमंत्र्यांनी फेटाळला आहे. पोलिसांनी व्हिडीओ काढला यात काही तथ्य नसल्याचे गृहमंत्री म्हणाले.</p>