कारागृह सुधारगृह ठरावे : नाईकनवरे

बंद्यांनी तयार केलेल्या गणेशमूर्ती स्टॉलचे उद्घाटन
कारागृह सुधारगृह ठरावे : नाईकनवरे

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

सायबर क्राईम, आर्थिक गुन्हे (crime) यांच्या पध्दतीत बदल होत आहेत. असे गुन्हे करण्यासाठीची बुध्दिमत्ता चांगल्या कार्यासाठी वापरावी. तसे न झाल्यामुळे कारागृहात बंदी म्हणून यावे लागते. वाट चुकलेला कोणी व्यक्ती कारागृहातून सुटल्यावर सुधारत असेल तर त्याला समाजाने सहकार्य करणे गरजेचे आहे.

कारागृहातील ( Jail )वातावरण हे शासनाच्या धोरणांशी सुसंगत आहे. मानवी हक्कांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली जाते. नाशिक व पुणे कारागृहाची कामगिरी याबाबत उल्लेखनीय आहे. पुरोगामी पध्दतीने येथे काम चालते. त्यातून नाशिक कारागृहातील उपक्रम आदर्श झाले आहेत.

कारागृहातील उपक्रमात मी नेहमी सहभागी होत असतो. कारागृहातून सुटल्यावर पुन्हा गुन्हेगारीकडे न वळता चांगल्या कामाकडे वळावे. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कैद्यांसाठी विविध उपक्रम राबविले जात असून कैद्यांसाठी हे कारागृह सुधारगृह ठरत आहे, असे प्रतिपादन पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी केले.

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील ( Nashikroad Central Jail ) बंद्यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाडू मातीच्या साडेपाचशे गणेश मूर्ती तयार केल्या आहेत. त्याचे प्रदर्शन कारागृहाच्या मुख्य प्रवेशव्दारावरील प्रगती केंद्रात सुरु झाले आहे. त्याचे पोलिस आयुक्त नाईकनवरे यांनी आज उद्घाटन केले. या मूर्ती नागरिकांसाठी विक्रीस उपलब्ध आहेत.

या उद्घाटन कार्यक्रमास नाशिकरोड कारागृह अधिक्षक प्रमोद वाघ, औरंगाबाद विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई, सहाय्यक पोलिस आयुक्त सिध्देश्वर धुमाळ, किशोर सुधारालयाचे प्राचार्य वासुदेव बुरकूल, महिला व बालहक्क संरक्षण समिती सदस्या सायली पालखेडकर, वरिष्ठ तुरुंगाधिकारी अशोक मालवाड, कारखाना व्यवस्थापक सचिन चिकणे,

नाशिकरोडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, गोदा फाऊन्डेशनच्या शीतल गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. कारागृह अधिक्षक प्रमोद वाघ यांनी प्रास्तविकात कारागृहातील रोजगारभिमुख उपक्रमांची माहिती दिली. वरिष्ठ तुरुंगाधिकारी संपत आढे, श्रृती भुतडा, के. पी. जाधव, योगेश देशमुख, विक्रांत थोरात, जितेंद्र बाराते, सतीश गायकवाड, संतोष खारतोंडे, भगवान महाले, आकाश माळी, मोरेश्वर कोठुळे, आदींसह कारागृहाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, गणेश मूर्ती पाहण्यासाठी व खरेदीसाठी नागरिकांनी पहिल्याच दिवशी गर्दी केली होती.

बंदीजनांना रोजगार

बंद्यांनी यंदाही विविध रुपातील मूर्ती साकारल्या आहेत. त्यात दगडूशेठ, लंबोदर, कमळ, फेटा, गाय, जास्वंद, त्रिमुखी, लालबाग, गादी, वक्रतुंड, देता-घेता आदी मूर्तींचा समावेश आहे. त्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मूर्ती विक्रीतून कारागृह प्रशासनाला चांगला महसूल तर बंदीजनांना रोजगार मिळत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com