दोन महिने बेपत्ता असलेल्या जॅक मा चा व्हिडिओ आला समोर

जॅक मा
जॅक मा

बीजिंग :

अलीबाबा व आंट ग्रुपचे सह-संस्थापक चीनी उद्योगपती जॅक मा अनेक दिवसांपासून गायब होते. आता त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने हा व्हिडिओ जारी केला आहे.

जॅक मा
जॅक मा

चीनी उद्योगपती जॅक मा अनेक दिवसांपासून बेपत्ता होते. त्यासंदर्भात उलटसुलट बातम्या येत होत्या. आता जॅक मा ग्रामीण शिक्षणासंदर्भातील एका कार्यक्रमात सहभागी झाल्याचा एक व्हिडिओ समोर आला.

ग्रामीण शिक्षक पुरस्कार सोहळा २०१५ पासून जॅक मा फाऊंडेशन करत आहे. नुकत्याच झालेल्या या सोहळ्यात जॅक मा यांनी देशभरातील १०० ग्रामीण शिक्षकांशी संवाद साधला.

केव्हापासून होते बेपत्ता

अलिबाबा समूहाचे संस्थापक आणि चीनमधील सर्वात श्रीमंत उद्योगपती जॅक मा गेल्या नोव्हेंबरपासून बेपत्ता होते. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी पंगा घेतल्यापासूनच ते गायब झाल्याने त्याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. चीन सरकारने आंट ग्रुप व अलीबाबा ग्रुप होल्डिंग लिमिटेडची तपासणी सुरु केली. आंट ग्रुपचा ३५ बिलियन डॉलरचा आयपीओ चीन सरकारने थांबला.

सरकावर केली होती टीका

जॅक मा यांनी ऑक्टोबर महिन्यात शांघायमध्ये एक भाषण केलं होतं. त्यात त्यांनी जागतिक बँकिंग नियमांना ‘ज्येष्ठ नागरिकांचा क्लब’ म्हणत जोरदार टीका केली होती. तसेच चीनच्या व्याजखोर वित्तीय नियम आणि सरकारी बँकांच्या कार्यप्रणालीवर सडकून टीका केली होती. शिवाय चिनी कम्युनिस्ट सरकारवरही त्यांनी कठोर शब्दात टीका केली होती. त्यामुळे जिनपिंग सरकारविरोधात चिनी नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याने जिनपिंग सरकार भडकले होते. या टीकेनंतर जॅक मा पुन्हा दिसलेच नाहीत. त्यामुळे जॅक मा गेले कुठे? असा सवाल केला जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com