नाव वकीलवाडी अन् वाहतुकीचे नियम कोणालाही न आवडी!

नाव वकीलवाडी अन् वाहतुकीचे नियम कोणालाही न आवडी!

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले महत्त्वाचे दोन समांतर रस्ते सध्या वाहनचालकांसाठी जणू काही वाहतुकीचे नियमभंग करण्याची हक्काची जागा बनल्याचे चित्र सध्या दररोज दिसत आहे....

रविवार कारंजा (Ravivar Karanja) सर्कलवरून रेडक्रॉस सिग्नलपर्यंत (Red Cross signal) येणारा एक आणि वकीलवाडीतून (Vakilwadi) महात्मा गांधी रोडला (MG road)जोडणारा दुसरा रस्ता दोन्हीही रस्ते एकेरी वाहतुकीसाठीच आहेत.

मात्र याचा सपशेल विसर नागरिकांना पडला आहे आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे आणि कोणीही यावे कशीही बेशिस्त गाडी चालवावी आणि वाहतूक कोंडीत भर टाकावी, ही नित्याची बाब झाली आहे. यावर उपाययोजना कधी करणार, असा संतप्त सवाल या ठिकाणी असलेले स्थानिक व सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

रस्त्यावरून चालणे मुश्किल

वकीलवाडी ते म. गांधी मार्ग आधीच अरुंद रस्ता. त्यात बेशिस्तपणे जागा मिळेल तिथे रस्त्यावरच लावलेल्या गाड्या आणि त्यातच अजून भर म्हणजे एकेरी मार्गात बेशिस्तांची घुसखोरी. मुख्य बाजारपेठेमुळे नागरिकांची येथे नेहमी खरेदीसाठी गर्दी होते.

या ठिकाणी बहुतांशी दुकाने मोबाईल सेलफोनची आहेत. येथील दुकानदार त्यांच्या नियोजित ऑफर्स व मोबाईलची माहिती देण्यासाठी रस्त्यावरच जाहिरात फलक लावतात. या सर्व गोष्टींचा त्रास रस्त्यावर चालणार्‍या नागरिकांना होतो. कधीकधी इतकी वाहतूककोंडी होते की, रस्त्यावर चालणेसुद्धा मुश्किल होऊन जाते.

टोईंगची तोंडदेखली कारवाई

बेशिस्त पार्किंगला (Parking) आळा बसावा, या उद्देशाने शहरात नो पार्किंग झोनमध्ये (No Parking Zone) पार्क केलेल्या वाहनांची टोईंग (Towing) करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र ही कारवाई तात्पुरता इलाज आणि तोंड देखलेपणाची ठरत आहे.

वाहनांची टोईंग झाल्यानंतर टोईंग व्हॅन निघून जाते, मात्र परिस्थिती परत जैसे थे होते. पुन्हा टोईंग व्हॅन येऊन वाहने उचलून जाते. दिवसभर हाच खेळ सुरू असतो. अनेकदा तर टोईंग व्हॅनमुळेदेखील वाहतूककोंडीत भर पडते.

एकेरी वाहतुकीचे बोर्ड फक्त नावालाच

दोन्ही रस्त्यांच्या तोंडावर लावलेले एकेरी वाहतुकीचे (One way traffic) बोर्ड फक्त नावालाच उरले असून त्याचा काहीही एक उपयोग नाही. वाहतूक पोलीस कधीच उपलब्ध नसतात, त्यामुळे वाहतूकदारांना कुणाचा धाक उरलेला नसल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात.

नियमांचा भंग

  • वाहनचालक (सर्वच प्रकारचे) समोर असलेला सिग्नल तोडतात.

  • सिग्नल तोडून एकेरी रस्त्यात घुसखोरी करतात.

  • सिग्नलतोड दुचाकीस्वारांच्या डोक्यात हेल्मेट नसते.

  • अनेकदा तो व्यक्ती त्याच्यासोबत इतर दोन जणांना घेऊन (ट्रिपल सीट) मार्गक्रमण करतो.

  • अनेक वेळा त्याने मास्कही घातलेले नसते.

रोगापेक्षा इलाज भयंकर

रेडक्रॉस सिग्नलजवळ वाहनधारकांनी एकेरी मार्गात प्रवेश करू नये, यासाठी एक बॅरिकेट टाकून वाहतूक पोलीस मोकळे झाले आहेत. मात्र या बॅरिकेटला वळसा घालून अनेक बहाद्दर एकेरी मार्गात प्रवेश करतात. त्यामुळे समस्या कमी होण्याऐवजी आणखी वाढताना दिसते. त्यामुळेच रोगापेक्षा इलाज भयंकर अशीच काहीशी परिस्थिती या भागात पाहायला मिळत आहे.

भरीत भर...!

बेशिस्त वाहनचालकांव्यतिरिक्त त्यात आणखी भर पडते ती, भाजीविक्रेते, फळविक्रेते आणि फेरीवाल्यांची. फळे किंवा भाजी खरेदी करण्यासाठी रस्त्यावरच आपले वाहन लावून किंवा थेट आपल्या दुचाकीवरूनच ग्राहक खरेदी करतात. त्यामुळे रस्त्यावरून चालणार्‍या वाहनांना अडथळा निर्माण होतो. परिणामी वाहतूककोंडीत भर पडते.

एकेरी रस्ता असूनदेखील नागरिक त्याचा दुहेरी वापर करतात आणि दिवसभरातील अर्धा वेळ या ठिकाणी वाहतूककोंडी होते. परिणामी वायू आणि ध्वनी प्रदूषण होऊन त्याचा आम्हाला प्रचंड त्रास होतो. त्यामुळे पोलीस प्रशासनाला विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर वाहतूक पोलिसाची या ठिकाणी नेमणूक करावी.

- अ‍ॅड. सचिन गिरी, स्थानिक रहिवासी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com