श्रमदानातून स्वच्छतेचा वसा जपणे सर्वांची जबाबदारी - डॉ. पवार

सप्तशृंगी गडावर श्रमदान व वृक्षारोपण
श्रमदानातून स्वच्छतेचा वसा जपणे सर्वांची जबाबदारी - डॉ. पवार

नाशिक | प्रतिनिधी Nashik

संत गाडगेबाबा ( Saint Gadge Baba)यांनी दिलेला स्वच्छतेचा वसा पुढे नेण्यासोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धनाची जबाबदारी (Responsibility for tree conservation) ही आपल्या सर्वांची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवून जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात यावे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health and Family Welfare Dr. Bharti Pawar)यांनी केले.

नांदुरी येथील सप्तशृंगीगड ( Saptshrungi Gad )येथे स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती कळवण व ग्रामपंचायत सप्तश्रृंगी गड यांच्या संयुक्त विद्यमाने श्रमदान मोहीम व वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यमंत्री डॉ. पवार बोलत होत्या. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, तहसीलदार बी. एम. कापसे, गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चव्हाण, सहायक उपवनसरंक्षक राजेंद्र मोरे, पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता युवराज वळवी, सरपंच रमेश पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. भारती पवार म्हणाल्या की, आपले घर, परिसर स्वच्छ असेल तर आरोग्य ही उत्तम राहते. स्वच्छता ही निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याने नागरिकांनी श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा. स्वच्छता व आरोग्याचा थेट संबंध येत असल्याने आपल्या परिसरातील सांडपाणी व घन कचऱ्याचे यथायोग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. जेणेकरून स्वच्छतेच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याची देखील जपणूक होण्यास मदत होईल, असेही डॉ. पवार यांनी यावेळी सांगितले.

भारतीय संस्कृतीत स्वच्छतेला अधिक महत्व असून आपण विविध सणांची सुरुवात घराच्या स्वच्छतेतून करीत असतो. लोकांनी घाण करू नये व इतरांनाही त्यापासून परावृत्त करावे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या संदेशाचा अंगीकार नागरिकांनी करावा, असे आवाहनही राज्यमंत्री डॉ. पवार यांनी यावेळी केले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी दिली.

वृक्षसंवर्धन काळाची गरज

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धन करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात वृक्ष लागवड करण्यासोबतच त्यांचे संवर्धन करावे, असे आवाहनही राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी यावेळी केले आहे.

या कार्यक्रमाप्रसंगी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विविध 75 वृक्ष लागवडीचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रातिनिधीक स्वरूपात डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत बांबू, शिसम, जांभूळ, कांचन यांचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच शिवालय तलाव परिसरात स्वच्छता करण्यात आली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com