
नाशिक । प्रतिनिधी Nashik
दरम्यान आमच्याकडे रिप्लेसमेंट रेडी आहे, एक-दोन जणांच्या जाण्याने काही फरक पडत नाही, असे महाराष्ट्र निर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी सांगितले. मागील दोन दिवसांपासून नाशिक दौर्यावर असलेले महाराष्ट्र निर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे काल सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मुंबईकडे रवाना झाले. ते नाशिकला असतानाच महाराष्ट्र निर्माण सेनेच्या प्रभाग 16 च्या माजी नगरसेविका मेघा साळवे यांच्यासह काहींनी शिंदे गटात प्रवेश केला, त्याबद्दल ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग नाशिक मध्ये आहे. त्यामुळे काही लोक गेले तरी पक्षाला काही फरक पडणार नाही, पक्ष सोडून जाणारे एक- दोनच आहे. पक्षाचे सर्व शाखाप्रमुख इतर वरिष्ठ पदाधिकारी, माजी नगरसेवक आमच्या सोबतच आहेत, अशी माहिती त्यानी दिली. दरम्यान दौर्याच्या पहिल्या दिवशी मंगळवारी नाशिक पूर्व तसेच पंचवटी भागातील एकूण 14 शाखाप्रमुख यांची मुलाखत त्यांनी वन टू वन घेतली होती.
त्यानंतर नवीन नाशिकच्या सहा, नाशिक रोडच्या सहा तसेच सातपूर भागातील पाच शाखाप्रमुख यांची चर्चा करून कामाचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे शहरातील विविध भागात चार संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करीत सायंकाळी साई भंडाराच्या कार्यक्रमात भेट देऊन आरती करून ठाकरे मुंबईला रवाना झाले. दोन दिवसांच्या दौर्यामुळे पक्षाचे स्थानिक पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. जिल्हाप्रमुख अंकुश पवार, महानगर प्रमुख दिलीप दातीर, ज्येष्ठ नेते सलीम शेख आदी उपस्थित होते.