
रायगड | Raigad
रायगड जिल्ह्यातील (Raigad District) खालापूर तालुक्यामधील (Khalapur Taluka) इर्शाळवाडी (Irshalwadi ) येथे काल रात्री साडे दहाच्या सुमारास दरड कोसळल्याची (Landslide) दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू (Death) झाला असून जवळपास ३० ते ४० घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेल्याचे सांगितले जात आहे. तसेच या घरांमधील १०० पेक्षा अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
तर दुसरीकडे सध्या घटनास्थळावर रेस्क्यू ऑपरेशन युद्ध पातळीवर सुरु असून आतापर्यंत ७५ ते ८० जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मंत्री उदय सामंत, दादा भुसे, गिरीश महाजन यांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी करत मदतकार्याचा आढावा घेतला. यानंतर आता या दुर्घटनेतून बचावलेल्या एका तरुणाने (Youth) आणि काही प्रत्यक्षदर्शींनी घडलेला प्रसंग सांगितला आहे.
याबाबत माहिती देतांना एक तरुण म्हणाला की, "आम्ही ५ ते ६ मित्र दररोज रात्री गावातील शाळेत झोपायला जातो. नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री सुद्धा शाळेत आलो. रात्रीच्या वेळी दोन वेळा मोठ्ठा आवाज झाला आणि आम्ही बाहेर पळालो. बाहेर बघितले तर काय संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले होते. आम्ही शाळेत होतो, म्हणून वाचलो. आई-बाबांना पळताही आले नाही. घर राहिले नाही आता फक्त माती उरली आहे", असे सांगतांना त्याला हुंदका अनावर झाला.
तसेच प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, "काही शाळकरी मुलांमुळे (School Children) गावातल्या लोकांना दरड कोसळल्याची माहिती मिळाली आणि तेव्हा अनेक गावकरी घरातून बाहेर आले. जेव्हा या मुलांनी आरडाओरडा केला, तेव्हा जेवढे वाचायचे तेवढे वाचले. बाकी सगळे ढिगाऱ्याखाली गेले", असे या प्रत्यक्षदर्शीने म्हटले.