IPL-2021 : राजस्थानचा दिल्लीवर दमदार विजय

IPL-2021 : राजस्थानचा दिल्लीवर दमदार विजय

मुंबई । वृत्तसंस्था

डेव्हिड मिलरचे अर्धशतक आणि अखेरच्या षटकांमध्ये मोठी फटकेबाजी करणार्‍या ख्रिस मॉरिसनेे राजस्थान रॉयल्सला तीन विकेट्स राखून दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवून दिला.

कर्णधार रिषभ पंतच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीने राजस्थानपुढे 148 धावांचे आव्हान ठेवले होते.पण त्यांच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला होता आणि राजस्थानला अडचणीत आणले होते. मात्र राजस्थानने षटकारासह हे आव्हान पूर्ण केले. या विजयासह राजस्थानने गुणतालिकेत पाचवे स्थान पटकावले आहे. त्याचबरोबर त्यांच्या खात्यामध्ये दोन गुणही जमा झाले आहेत.

दिल्लीचे 148 धावांचे आव्हान माफक वाटत असले तरी राजस्थानची सुरुवात मात्र चांगली झाली नाही. दिल्लीच्या ख्रिस वोक्सने राजस्थानच्या दोन्ही सलामीवीरांना बाद केले आणि त्यांची 2 बाद 13 अशी अवस्था केली. त्यानंतर गेल्या सामन्यात शतक झळकावणार्‍या संजू सॅमसनने चौकारासह सुरुवात केली असली तरी त्याला कागिसो रबाडाने बाद केले आणि राजस्थानची 3 बाद 17 अशी अवस्था झाली. त्यानंतर शिवम दुबे आणि रियान परागही लवकर बाद झाले आणि त्यामुळेच 50 धावा करण्यापूर्वीच राजस्थानचा अर्धा संघ गारद झाला.

राजस्थानची 5 बाद 42 अशी अवस्था होती. त्यावेळी आज संघात पुनरागमन करणार्‍या डेव्हिड मिलरने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मिलरने यावेळी 43 चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 62 धावांची खेळी साकारली आणि संघाला विजयाची आशा दाखवली. पण मोठा फटका मारण्याच्या नादात मिलर बाद झाला आणि पुन्हा एकदा राजस्थानचा संघ अडचणीत सापडला. पण त्यानंतर मॉरिसने षटकार खेचत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मॉरिसने 18 चेंडूंत 4 षटकाराच्या जोरावर 36 धावा केल्या.

तत्पूर्वी राजस्थानने नाणेफेक जिंकली आणि त्यांनी दिल्ली कॅपिटल्सला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. राजस्थानच्या संघात पुनरागमन करणार्‍या जयदेव उनाडकटने दिल्लीला एकामागून एक तीन धक्के दिले. उनाडकटने गेल्या सामन्यात दिल्लीसाठी मॅच विनर ठरलेल्या पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांना झटपट बाद केले. त्यानंतर स्वत:च्या गोलंदाजीवर अजिंक्यचा झेल पकडला आणि दिल्लीची 3 बाद 36 अशी अवस्था केली.

दिल्लीची तीन फलंदाज बाद झाल्यावर चांगली परिस्थिती नव्हती. पण दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. पंतने 32 चेंडूंत 9 चौकारांच्या जोरावर 51 धावांची सर्वाधिक खेळी साकारली. पण पंत यावेळी धावचीत झाला आणि पुन्हा एकदा दिल्लीच्या धावगतीला ब्रेक लागला. अखेरच्या षटकांमध्ये तळाच्या फलंदाजांनी थोड्या धावा जमवल्यामुळे दिल्लीला राजस्थानपुढे 148 धावांचे आव्हान ठेवता आले. राजस्थानकडून उनाडकटने सर्वाधिक तीन बळी मिळवले, तर मुस्ताफिझूर रेहमानने दोन फलंदाजांना बाद करत उनाडकटला चांगली साथ दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com