IPL-2021 : पंजाबचा मुंबईवर विजय

IPL-2021 : पंजाबचा मुंबईवर विजय

चेन्नई । वृत्तसंस्था

चेपॉकच्या खेळपट्टीवर पुन्हा एकदा कमी धावांचे लक्ष्य असूनही चुरस पाहायला मिळाली. अतिरिक्त फिरकी मिळत असलेल्या या खेळपट्टीवर मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण, पंजाब किंग्सच्या फलंदाजांनी भक्कम भागीदारी करताना मुंबई इंडियन्सला पराभवाची धूळ चारली.मुंबई इंडियन्सचा हा सलग दुसरा पराभव ठरला. सलग तीन पराभवानंतर पंजाब किंग्सने अखेर विजयावर शिक्कामोर्तब केले. पंजाबनं 9 विकेट राखून हा सामना जिंकला.

नाणेफेक जिंकून पंजाबचा कर्णधार केएल राहुलने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीला आलेल्या मुंबईने चेन्नईच्या संथ खेळपट्टीवर 20 षटकात 6 बाद 131 धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबकडून केएल राहुल आणि ख्रिस गेल यांनी दमदार भागीदारी रचत 17.4 षटकातच विजय मिळवला.

मुंबईच्या छोटेखानी आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचे सलामीवीर केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी अर्धशतकी सलामी दिली.

53 धावांची सलामी भागीदारी केल्यानंतर पंजाबला पहिला धक्का बसला. मुंबईचा फिरकीपटू राहुल चहरने मयंकला (25) धावांवर बाद केले. सूर्यकुमारने त्याचा झेल घेतला. त्यानंतर मैदानात आलेल्या ख्रिस गेलने राहुलसोबत 16व्या षटकात पंजाबचे शतक फलकावर लावले. राहुलने 17व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. 18व्या षटकात या दोघांनी पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ख्रिस गेल आणि केएल राहुल यांनी 79 धावाची अभेद्य भागीदारी रचत हा विजय साकारला. राहुलने नाबाद 60 तर गेलने नाबाद 43 धावांचे योगदान दिले.

प्रथम फलंदाजी करणार्‍या मुंबईची सुरुवात खराब झाली. दुसर्‍याच षटकात मुंबईचा सलामीवीर क्विंटन डि कॉकने दीपक हुडाला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण, मोझेस हेन्रिक्सने त्याचा झेल टिपला. कॉकला 3 धावा करता आल्या. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईने पहिल्या 6 षटकांच्या पॉवरप्लेमध्ये सर्वात कमी धावा करण्याचा लाजिरवाणा विक्रम नोंदवला.

पॉवरप्लेमध्ये मुंबईने 1 बाद 21 धावा केल्या. डि कॉक बाद झाल्यानंतर रोहितला साथ देण्यासाठी ईशान किशन मैदानात आला. मात्र, मुंबईने पॉवरप्लेनंतर ईशान किशनला गमावले. आज संधी मिळालेल्या फिरकीपटू रवी बिश्नोईने किशनला यष्टीपाठी झेलबाद केले. किशनला 17 चेंडूत केवळ 6 धावा करता आल्या. त्यानंतर रोहित-सूर्यकुमार यांनी अर्धशतकी भागीदारी करत मुंबईचा डाव सांभाळला. 14व्या षटकात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने आपले अर्धशतक पूर्ण केले.

रवी बिश्नोईने पंजाबला 17व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर यश मिळवून दिले. मोठा फटका खेळण्याच्या नादात सूर्यकुमार यादव ख्रिस गेलकडे झेल देऊन बसला. सूर्यकुमारने 3 चौकार आणि एका षटकारासह 33 धावा केल्या. पुढच्याच षटकात मुंबईने रोहितला गमावले. त्याने 5 चौकार आणि 2 षटकारांसह 63 धावा केल्या. या दोघांनंतर मुंबईच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. पंजाबकडून मोहम्मद शमी आणि बिश्नोईने प्रत्येकी 2 बळी घेतले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com