IPL 2021 : पंजाबचा राजस्थानवर चार धावांनी विजय

IPL 2021 : पंजाबचा राजस्थानवर चार धावांनी विजय

मुंबई । Mumbai (वृत्तसंस्था)

पंजाब किंग्सने या हंगामातील सर्वाधिक धावसंख्या आज रचत राजस्थानपुढे 222 धावांचे आव्हान ठेवले होते. लोकेश राहुल आणि दीपक हुडा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पंजाबने हा धावांचा डोंगर उभारला.

या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचा युवा कर्णधार संजू सॅमननने धडाकेबाज फलंदाजी करत अर्धशतक साकारले. पण या सामन्यात पंजाबने चार धावांनी विजय साकारला.

राजस्थानचे फलंदाज एकामागून एक बाद होत असले तरी सॅमसनने यावेळी धडाकेबाज फटकेबाजी करत या आयपीएलमधील पहिले शतक फटकावण्याचा मान पटकावला.

कर्णधार लोकेश राहुल, ख्रिस गेल, दीपक हुडा यांनी राजस्थानच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्यामुळेच पंजाबच्या संघाला राजस्थानपुढे 222 धावांचे तगडे आव्हान ठेवता आले. आतापर्यंतच्या आयपीएलमधील ही सर्वाधिक धावसंख्या ठरली आहे. कारण आतापर्यंत एकाही संघाला या आयपीएलमध्ये 200 धावांचा टप्पा गाठता आला नव्हता. राजस्थानने नाणेफेक जिंकली आणि पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले.

यावेळी पंजाबची सुरुवात चांगली झाली नाही. कारण सलामीवीर मयांक अगरवालला यावेळी राजस्थानचा युवा वेगवान गोलंदाज चेतन साकरियाने बाद केले आणि पंजाबला पहिला धक्का दिला. मयांकला 14 धावांवर समाधान मानावे लागले.

मयांक बाद झाल्यावर ख्रिस गेल फलंदाजीला आला आणि त्यानंतर त्याने कर्णधार लोकेश राहुलच्या साथीने राजस्थानच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार केला. या दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात ख्रिस गेलने आयपीएलमधील 350वा षटकार खेचला. गेलला यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही.

कारण रायन परागने बेन स्टोक्सकरवी गेलला बाद केले, गेलने यावेळी 28 चेंडूंत 4 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 40 धावा केल्या. या सामन्यात गेलला एकदा आणि राहुलला दोनदा जीवदान मिळाले.

धडाकेबाज फलंदाजी करत असलेला ख्रिस गेल बाद झाल्यावर राहुल आणि दीपक हुडा यांनी संघाची धावगती चांगलीच वाढवली. राहुलने आपले अर्धशतकही पूर्ण केले. पण राहुलपेक्षा हुडा जास्त आक्रमक फलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळाले. हुडाने 20 चेंडूंमध्येच आपले अर्धशतक साजरे केले. अर्धशतक पूर्ण करताना हुडाने सहा षटकार आणि एक चौकार लगावला. हुडाने 28 चेंडूंत चार चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर 64 धावांची तुफानी खेळी साकारली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com