IPL-2021: मुंबईचा पहिला विजय; कोलकातावर मात

IPL-2021:  मुंबईचा पहिला विजय; कोलकातावर मात

चेन्नई । वृत्तसंस्था

मुंबई इंडियन्स सोडून दिलेल्या सामन्यात राहुल चहरनें चुरस निर्माण केली. चहरनें कोलकाता नाईट राइडर्सच्या चार फलंदाजांना माघारी पाठवून मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात विजयाची आस निर्माण केली. पण, कृणाल पांड्यानें केकेआरचा फॉर्मात असलेला खेळाडू आंद्रे रसेलचा शून्यावर झेल सोडला अन् तिथे पुन्हा मुंबई इंडियन्सच्या हातातून सामना गेला होता. कृणालच्या पुढच्याच षटकात जसप्रीत बुमराहनं रसेलला आणखी एक जीवदान दिलं.

तरीही सामना अत्यंत रंगतदार झाला. कृणाल व जसप्रीत यांनी अखेरच्या षटकांत टिच्चून मारा करताना केकेआरच्या डगआऊटमध्ये तणावाचे वातावरण निर्माण केले. ट्रेंट बोल्टनं अखेरच्या षटकात रसेलची विकेट घेत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. कोलकाताला विजयासाठी 36 चेंडूंत 40 धावांची गरज होती. पण, मुंबईच्या गोलंदाजांची सुरेख कामगिरी करताना संघाला 10 धावांनी विजय मिळवून दिला.

केकेआरच्या गोलंदाजांनी साजेशी कामगिरी केल्यानंतर फलंदाजांकडूनही त्यांना तशीच साथ मिळाली. नितीश राणा व शुबमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली. राहुल चहरनं ही भागीदारी संपुष्टात आणली. शुबमन गिल 24 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकारांसह 33 धावांवर माघारी परतला. राहुल त्रिपाठी ( 5) यालाही चहरनं बाद केले. त्यानंतर चहरनें केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गनची विकेटही घेतली.

पण, एका बाजूनं नितीश राणा खिंड लढवत होता. चहरच्या चौथ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर नितीशनं पुढे जाऊन फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु तो फसला. क्विंटन डी कॉकनें त्याला यष्टिचीत केलें. नितीशनं 47 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकारांसह 57 धावा केल्या, राहुल चहरनं 27 धावांत चार विकेट्स घेतल्या.

केकेआरच्या विकेट्स पडण्याचे सत्र कायम राहिले. कृणाल पांड्यानं केकेआरच्या शाकिब अल हसनला ( 9) माघारी पाठवले. त्याच षटकात कृणालनं स्वतःच्या गोलंदाजीवर आंद्रे रसेलचा झेल सोडला. रसेलनें तेव्हा खातंही उघडलें नव्हतें. त्यानंतर 5 धावांवर असताना बुमराहनं त्याचा झेल सोडला. सामन्यातील रंगत अखेरच्या षटकापर्यंत कायम राहिली. कृणालनें 18व्या षटकात फक्त 3 धावा देताना सोडलेल्या झेलची भरपाई केली. बुमराहनेंही 19व्या षटकात 4 धावा दिल्या आणि केकेआरला विजयासाठी 6 चेंडूंत 15 धावा हव्या होत्या. ट्रेंट बोल्टच्या अखेरच्या षटकांत पहिल्या दोन चेंडूंत दोन धावा आल्या. तिसर्‍या चेंडूवर बोल्टनें रसेलला बाद केलें. पुढच्याच चेंडूवर त्यानें पॅट कमिन्सचा त्रिफळा उडवला. कोलकाताला 7 बाद 142 धावा करता आल्या. मुंबईनें 10 धावांनी हा सामना जिंकला.

सूर्या- रोहितने डाव सावरला पण..

सूर्यकुमार यादव व रोहित शर्मा यांची फटकेबाजी वगळता मुंबई इंडियन्सच्या अन्य फलंदाजांनी शरणागती पत्करली. केकेआरच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करताना संघाला सामन्यात पुनरागमन करून दिलं. रोहितचा आजचा खेळ फार संथ वाटला. त्यात हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड, इशान शर्मा यांच्याकडूनही अपेक्षित कामगिरी न झाल्यानं मुंबई इंडियन्सला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. आंद्रे रसेलनें 12 चेंडूंत 5 विकेट्स घेत मुंबईला मोठे धक्के दिले. मुंबईनं अखेरच्या पाच षटकांत 7 विकेट्स गमावल्या.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com