IPL-2021 : मुंबईचा हैदराबादवर विजय

IPL-2021 : मुंबईचा हैदराबादवर विजय

चेन्नई । वृत्तसंस्था

मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा आयपीएल 2021मध्ये गमावलेला सामना खेचून आणला. सनरायझर्स हैदराबादने सलग दुसर्‍या सामन्यात स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला.

जॉनी बेअरस्टोला सलामीला खेळवल्याने हैदराबादची मधली फळी कमकुवत झाली होती आणि अनुभवाचा अभाव असल्यानें ती मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांसमोर ढेपाळली.

राहुल चहरच्या तीन विकेट्स, हार्दिक पांड्याचे दोन डायरेक्ट हिट्स अन् जसप्रीत बुमराह व ट्रेंट बोल्ट यांचा भेदक मारा यांच्या जोरावर मुंबईनें हा सामना जिंकला. चांगली सुरुवात करूनही हैदराबादने पुन्हा शरणागती पत्करली. मुंबई इंडियन्सने हा सामना 13 धावांनी जिंकला.

प्रथम फलंदाजी करत मुंबईने 150 धावा केल्या होत्या. हैदराबादने शानदार सुरूवात केली. पण मुंबईच्या गोलंदाजांनी पुन्हा एकदा धमाकेदार कामगिरी करत विजय मिळून दिला.

विजयासाठी 150 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या हैदराबादला कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्ट यांनी धमाकेदार सुरूवात करुन दिली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 7.2 षटकात 67 धावा केल्या.

ही जोडी चांगल्या फॉर्ममध्ये असताना बेयरस्टो हिट विकेट झाला. त्याने 22 चेंडूत 43 धावा केल्या. त्यानंतर आलेला मनिष पांडे 2 धावा करून माघारी परतला. तर हार्दिक पंड्याने एक अफलातून थ्रो करून कर्णधार डेव्हिड वॉर्नरला धावबाद केले. त्याने 34 चेंडूत 36 धावा केल्या.

वॉर्नरच्या विकेटनंतर हैदराबादचा डाव गडगडला. मधळ्या फळीतील फलंदाजांनी हजेरी लावण्याचे काम केले. विराट सिंग 11, अभिषेक शर्मा 2 आणि राशिद खान शून्यावर बाद झाले. एका बाजूने विकेट पडत असताना विजय शंकर मात्र लढा देत होता.

हैदराबादविरुद्ध मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी मुंबईला धमाकेदार सुरूवात करून दिली.

या दोघांनी 5 षटकात 48 धावा केल्या. पण सातव्या षटकात विजय शंकरने रोहित शर्माला 32 धावांवर बाद केले. त्याने 25 चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकार मारले. त्यानंतर आलेला सूर्यकुमार यादव 10 धावांवर बाद झाला. तर जम बसलेला सलामीवीर डी कॉक 40 धावांवर माघारी परतला.

मधळ्या फळीतील इशान किशनला आज धावाच करता आल्या नाहीत. त्याने 21 चेंडूत फक्त 12 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर आलेल्या हार्दिकला पुन्हा एकदा अपयश आले. तो फक्त 7 धावा करू शकला.

अखेरच्या काही षटकात कायरन पोलार्डने केलेल्या फटकेबाजीमुळे मुंबईला 20 षटकात 5 बाद 150 पर्यंत मजल मारता आली. पोलार्डने 22 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 35 धावा केल्या.हैदराबादकडून विजय शंकरने 2 तर मुजिबने दोन विकेट घेतल्या. खलिद अहमदने एक विकेट घेतली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com