Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याकोलकाताचा हैदराबादवर 10 धावांनी विजय

कोलकाताचा हैदराबादवर 10 धावांनी विजय

चेन्नई । वृत्तसंस्था

कोलकाता नाइट राडयर्सने पहिल्याच सामन्यात दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजी करत सनरायझर्स हैदराबादवर 10 धावांनी विजय मिळवला. नितिश राणाच्या 80 धावाच्या जोरावर कोलकाताने हैदराबादपुढे 188 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग हैदराबादला यशस्वीपणे करता आला नाही आणि त्यांना पराभव पत्करावा लागला.

- Advertisement -

कोलकाताच्या 188 धावांंचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात चांगली झाली नाही. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला पहिल्याच षटकात फक्त एका धावेवर असताना जीवदान मिळाले होते. पण याचा फायदा वॉर्नरला उठवता आला नाही. कोलकाताचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णनने वॉर्नरला बाद करत हैदराबादला मोठा धक्का दिला. वॉर्नरला यावेळी तीन धावांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर सलामीवीर वृद्धिमान साहाही सात धावावंर बाद झाला आणि हैदराबादला दुसरा धक्का बसला.

हैदराबादने आपले दोन्ही सलामीवीर लवकर गमावले. पण त्यानंतर जॉनी बेअरस्टो आणि मनीष पांडे यांनी संघाला डाव सावरला. जॉनी आणि पांडे या दोघांनी कोलकाताच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. जॉनीने यावेळी षटकारासह आपले अर्धशतक साजरे केले. पण अर्धशतक झळकावल्यावर मात्र जॉनीला जास्त काळ फलंदाजी करता आली नाही. कोलकाताच्या पॅट कमिन्सने यावेळी जॉनीला बाद केले. जॉनीने यावेळी 40 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटाकारांच्या जोरावर 55 धावांची खेळी साकारली.

सलामीवीर शुभमन गिलने यावेळी चौकार लगावत कोलकाताला चांगली सुरुवात करून दिली. पण गिलपेक्षा राणा यावेळी जास्त आक्रमक फलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळाले. गिलला यावेळी मोठी फटकेबाजी करता आली नाही. हैदराबादच्या रशिद खानने यावेळी गिलला त्रिफळाचीत केले आणि संघाला पहिले यश मिळवून दिले. गिलला यावेळी 15 धावांवरच समाधान मानावे लागले. गिल बाद झाल्यावर कोलकाताला धक्का बसला असला तरी राणाने यावेळी धडाकेबाज फलंदाजी करणे सोडले नाही.राणाने यावेळी हैदराबादच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. राणाने यावेळी उत्तुंग षटकार लगावत आपले अर्धशतक पूर्ण केले.

राहुल त्रिपाठीने यावेळी फक्त 28 चेंडूंत आपले अर्धशतक साकारले. हे त्रिपाठीचे आयपीएलमधील सहावे अर्धशतक ठरले. पण अर्धशतक झळकावल्यावर त्रिपाठी जास्त काळ फलंदाजी करू शकला नाही, कारण टी. नटराजनच्या गोलंदाजीवर त्याचा सुंदर झेल हैदराबादचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने पकडला. त्रिपाठीने यावेळी 29 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 53 धावांची खेळी साकारली. राणाने यावेळी 56 चेंडूंत 9 चौकार आणि चार षटकारांसह 80 धावांची दमदार खेळी साकारली.

नितीश राणाची वादळी खेळी
केकेआरसाठी 50हून अधिक षटकार ठोकणारा नितीश राणा सहावा फलंदाज ठरला. याआधी आंद्रे रसेल, ख्रिस लिन, युसुफ पठाण, सुनील नरिन आणि रॉबिन उथप्पा यांनी केकेआरसाठी ही कामगिरी केली आहे.काही दिवसांपूर्वीच नितीश राणा करोना पॉझिटिव्ह आढळला होता आणि तंदुरुस्त झाल्यानंतर तो पुन्हा संघात सामील झाला. आजच्या सामन्यात नितीश राणा आणि शुबमन गिल यांनी केकेआरसाठी 53 धावांची सलामी दिली.

शुबमन बाद झाल्यावर राणाने कोणतेही दडपण न घेता डावाच्या दहाव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर आपले अर्धशतक पूर्ण केले. नितीश राणाने विजय शंकरच्या या षटकातील शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून आपल्या आयपीएल कारकीर्दीचे 12वे अर्धशतक पूर्ण केले. 80 धावांवर असताना राणा बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 4 षटकार ठोकले. आपले अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर नितीश राणाने एका अनोख्या हावभावामध्ये आनंद साजरा केला. राणा सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. अलीकडे त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये शानदार प्रदर्शन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या