IPL-2021 : दिल्लीचा मुंबईवर विजय

IPL-2021 : दिल्लीचा मुंबईवर विजय

चेन्नई । वृत्तसंस्था

अखेरच्या षटकापर्यंत प्रतिस्पर्धी संघाला लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भाग पाडायचे अन् प्रमुख गोलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर विजय मिळवण्याची मुंबई इंडियन्सची रणनीती आज अपयशी ठरली. 137 धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स विजयी खूर्चीवर बसले होते, परंतु ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह यांनी त्यांना संघर्ष करण्यास भाग पाडले. दिल्ली कॅपिटल्सनें 6 विकेट्सने सामना जिंकला. किरॉन पोलार्डनं टाकलेला नो बॉल दिल्लीची विजयी धाव ठरली. या सामन्यात शिखर धवनने आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून 5000 धावा करणार्‍या पहिल्या फलंदाजाचा मान पटकावला.

फिरकीला मदत करणार्‍या चेन्नईच्या चेपॉक खेळपट्टीवर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने 20 षटकात 9 बाद 137 धावा उभारल्या. रोहितव्यतिरिक्त (44) मुंबईच्या इतर फलंदाजांनी निराशा केली. आज दिल्ली संघात संधी मिळालेल्या अनुभवी अमित मिश्राने 4 षटकात 24 धावा देत 4 बळी घेतले. मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने केवळ 4 गडी गमावले.

मुंबईच्या छोटेखानी आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. फिरकीपटू जयंत यादवने दिल्लीचा मुंबईकर फलंदाज पृथ्वी शॉला दुसर्‍याच षटकात माघारी पाठवले. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि शिखर धवन संघासाठी उभे राहिले. पहिल्या 6 षटकांच्या पॉवरप्लेमध्ये दिल्ली कॅपिटल्सने 1 बाद 39 धावा केल्या. 9व्या षटकात स्मिथ आणि धवनने अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. त्यानंतर कायरन पोलार्डने मुंबईला दुसरे यश मिळवून दिले. त्याने स्टीव्ह स्मिथला वैयक्तिक 33 धावांवर पायचित पकडले.

सुसाट फॉर्मात असलेला धवन संघाला विजय मिळवून देईल असे वाटत होते, पण 15व्या षटकात दिल्लीने धवनला गमावले. मुंबईचा फिरकीपटू राहुल चहरने त्याला कृणालकरवी झेलबाद केले. धवनने 5 चौकार आणि एका षटकारासह 45 धावांची खेळी केली. धवननंतर पंतही स्वस्तात माघारी परतला, पण शिमरोन हेटमायर आणि ललित यादव यांनी दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दिल्लीने 19.1 षटकात 4 गडी गमावत हे आव्हान गाठले.

रोहित शर्मा आणि क्विंटन डि कॉक यांनी मुंबईच्या डावाची सुरुवात केली. तिसर्‍या षटकात दिल्लीचा गोलंदाज मार्कस स्टॉइनिसने क्विंटन डि कॉकला बाद करत मुंबईला पहिला धक्का दिला. डि कॉकने 2 धावा केल्या. त्यानंतर रोहितने सूर्यकुमारला हाताशी घेत पहिल्या पॉवरप्लेमध्ये मुंबईसाठी 1 बाद 55 धावा केल्या. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केल्यानंतर आवेश खानने दिल्लीला यश मिळवून दिले. चांगल्या फॉर्मात खेळणार्‍या सूर्यकुमारला मुंबईने 7व्या षटकात गमावले. सूर्यकुमारने 24 धावा केल्या. त्यानंतर अर्धशतकाकडे वाटचाल करणार्‍या रोहितला अमित मिश्राने आपल्या जाळ्यात अडकवले. मोठा फटका खेळण्याच्या नादात रोहित स्मिथकडे झेल देऊन बसला. त्याने 3 षटकार आणि 3 चौकारांसह 44 धावा केल्या.

रोहित बाद झाल्यानंतर मुंबईचा डाव गडगडला. मिश्राने हार्दिक पंड्याला शून्यावर बाद केले. हार्दिकनंतर कृणाल पंड्याही स्वस्तात बाद झाला. त्याला ललित यादवने बाद केले. त्यानंतर आलेल्या कायरन पोलार्डला मिश्राने आपल्या गुगलीत अडकवले. या पडझडीनंतर ईशान किशन आणि जयंत यादवने छोटेखानी भागीदारी उभारली. किशनने 26 तर यादवने 23 धावा केल्या. मिश्राव्यतिरिक्त आवेश खानने 15 धावा देत 2 बळी टिपले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com