IPL-2021: चेन्नईचा पंजाबवर विजय

IPL-2021: चेन्नईचा पंजाबवर विजय

मुंबई । वृत्तसंस्था

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने पंजाब किंग्सवर आज सहा विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह चेन्नईने या आयपीएलमधील आपले गुणांचे खाते उघडले आहे.

दीपक चहरच्या भेदक गोलंदाजीने पंजाबच्या चार फलंदाजांना माघारी धाडले आणि त्यांच्या धावसंख्येला वेसण बसली. त्यामुळे पंजाबला प्रथम फलंदाजी करताना चेन्नईपुढे 107 धावांचे आव्हान ठेवता आले. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला पहिला धक्का लवकर बसला असला तरी त्यानंतर मात्र मोइन अली आणि फॅल ड्यु प्लेसिस यांनी चेन्नईच्या विजयाचा मार्ग सुकर केला.

पंजाबने चेन्नईपुढे विजयासाठी 107 धावांचे माफक आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला ऋतुराज गायकवाडच्या रुपात पहिला धक्का बसला. ऋतुराजला पाच धावांवर समाधान मानावे लागले. पण त्यानंतर मोइन अली आणि फॅफ ड्यु प्लेसिस यांची चांगलीच जोडी जमली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी रचत संघाच्या विजयाचा मार्ग सुकर केला.

या सामन्याच्या नाणेफेकीचा कौल चेन्नईच्या बाजूने लागला आणि त्यांनी पंजाबच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. चेन्नईच्या गोलंदाजांनी कर्णधार धोनीचा हा निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले.वेगवान गोलंदाज दीपक चहरने पहिल्याच षटकात मयांक अगरवालला बाद केले, त्याला यावेळी भोपळाही फोडता आला नाही.

दीपकने मयांकनंतर ख्रिस गेल, दीपक हुडा आणि निकोलस पुरन यांनाही बाद करत पंजाबचे कंबरडे मोडले. त्याचबरोबर कर्णधार लोकेश राहुलला फक्त 10 धावांवर समाधान मानावे लागले आणि धावचीत होत त्याने आत्मघात केला. पण त्यानंतर पंजाबच्या संघातील युवा फलंदाज शाहरुख खानने पंजाबला तारले आणि त्याच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर पंजाबला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. पंजाबसाठी कर्दनकाळ ठरला तो दीपक चहर.

दीपकने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर पंजाबची फलंदाजी खिळखिळी करून टाकली. गेल, हुडा, अगरवाल आणि पुरन यांना बाद करत त्याने पंजाबच्या संघाला एकामागून एक हादरे दिले आणि त्यामधून पंजाबचा संघ सावरू शकला नाही. चहरने चार षटकांमध्ये फक्त 13 धावा देत चार फलंदाजांना तंबूत धाडले. त्याचबरोबर त्याने एक षटक निर्धावही टाकले.

पंजाबच्या संघाला या पराभवानंतर मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळाले आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यावरही पंजाबचा संघ आता सातव्या स्थानावर घसरला.आठव्या स्थानावर सनरायझर्स हैदराबादचा संघ असून त्यांना पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. पण आता उद्या त्यांचा दुसरा सामना मुंबई इंडियन्सबरोबर आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात जर हैदराबादने विजय साकारला तर पंजाबचा संघ तळाला म्हणजेच आठव्या स्थानावर जाऊ शकतो.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com