IPL-2021 : बंगळुरूचा हैदराबादवर विजय

IPL-2021 : बंगळुरूचा हैदराबादवर विजय

चेन्नई । वृत्तसंस्था

येथे आज रंगतदार ठरलेल्या आयपीएलच्या सहाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायजर्स हैदराबादला नमवून 6 धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून हैदराबादने बंगळुरूला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर हैदराबादने बंगळुरूला 20 षटकांत 8 बाद 149 धावांवर रोखले. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने अधिक दबाव घेतलयाने गडी गमावले. बंगळुरूचा मोहम्मद सिराज, शाहबाज अहमद आणि हर्षल पटेल यांच्या भेदक गोलंदाजीमुळे हैदराबादला 20 षटकांत 9 बाद 143 धावांपर्यंतच मजल मारता आली. बंगळुरूकडून अर्धशतक झळकावणारा मॅक्सवेल 'सामनावीर' ठरला. स्पर्धेतील बंगळुरूचा हा सलग दुसरा विजय आहे. हैदराबादचा मात्र हा सलग दुसरा पराभव ठरला.

हैदराबादच्या डावाची सुरुवात डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा यांनी केली. बंगळुरूचा गोलंदाज मोहम्मद सिराजने पहिले षटक निर्धाव टाकले. दुसऱ्याच षटकात त्याने साहाला माघारी धाडले. नंतर मनीष पांडे आणि वॉर्नर यांनी संघाचा डाव सावारला. या दोघांनी पहिल्या पॉवरप्लेमध्ये 6 षटकात 1 बाद 50 धावा केल्या. पांडे आणि वॉर्नर यांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. 13व्या षटकात वॉर्नरने अर्धशतक झळकावले. अर्धशतकानंतर मोठा फटका खेळण्याच्या नादात वॉर्नर बाद झाला. 7 चौकार आणि एका षटकारासह वॉर्नरने 54 धावा केल्या.

शेवटच्या 4 षटकांत 35 धावांची गरज असताना हैदराबादने जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे आणि अब्दुल समद या ३ फलंदाजांना शाहबाजच्या एकाच षटकात गमावले. बेअरस्टोन 13 आणि पांडे 38 धावा काढून माघारी परतले. समद भोपळाही फोडू शकला नाही. त्यानंतर आलेला विजय शंकरही हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर विराटकडे झेल देऊन बाद झाला. राशिद खानने सिराजला पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून धावांचे अंतर कमी केले, मात्र याच षटकात जेसन होल्डर झेलबाद झाला. शेवटच्या षटकात हैदराबादला विजयासाठी 16 धावांची गरज होती. मात्र हर्षल पटेलच्या षटकात हैदराबादला केवळ 9 धावा करता आल्या. बंगळुरूकडून अहमदने 2 षटकात 7 धावा देत 3 बळी घेतले. सिराज आणि पटेल यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले.

बंगळुरूकडून विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल यांनी डावाची सुरुवात केली. तिसऱ्याच षटकात भुवनेश्वरने पडीक्कलला (11) बाद केले. काही धावांच्या अंतरानंतर तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आलेला शाहबाज अहमदही (14) बाद झाला. त्याला नदीमने राशिद खानकरवी झेलबाद केले. त्यानंतर विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेलने बंगळुरूला सावरले. 10 षटकात बंगळुरूने 2 बाद 63 धावा केल्या. संघाला शतकाजवळ नेताना जेसन होल्डरने विराटला बाद केले. विराटने 33 धावा केल्या. विराटनंतर एबी डिव्हिलियर्स मैदानात आला, राशिद खानने त्याला स्थिरावण्याची संधी दिली नाही. वॉर्नरकडे झेल देऊन तो एका धावेवर बाद झाला. बंगळुरूने 15व्या षटकात शतक पूर्ण केले.

शतकानंतर बंगळुरूने वॉशिंग्टन सुंदर (8) आणि डॅनियल ख्रिश्चन (1) या दोन फलंदाजांना गमावले. राशिद खानने सुंदरला झेलबाद केले. राशिदने त्याच्या 4 षटकात फक्त 18 धावा देऊन 2 बळी मिळवले. तर टी. नटराजनने ख्रिश्चनला यष्टीपाठी झेलबाद केले. दुसऱ्या बाजुला असलेल्या ग्लेन मॅक्सवेलने फटकेबाजी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. मॅक्सवेलने 5 चौकार आणि 3 षटकारांसह 59 धावांची खेळी केली. शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला. हैदराबादकडून जेसन होल्डरने सर्वाधिक 3 बळी घेतले. राशिद खानने 18 धावांत 2 फलंदाजांना माघारी धाडले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com