IPL-2021 : बंगळुरूचा राजस्थानवर विजय

IPL-2021 : बंगळुरूचा राजस्थानवर विजय

मुंबई । वृत्तसंस्था

आयपीएल स्पर्धेत बंगळुरुची विजयी घोडदौड सुरुच असून राजस्थान विरुद्धचा सामना जिंकत बंगळुरुने विजयी चौकार मारला. या सामन्यात विराट आणि देवदत्त पडिक्कल या जोडीने राजस्थानच्या गोलंदाजांना घाम फोडला. राजस्थानने विजयासाठी दिलेले 178 धावांचे लक्ष्य सहज गाठले.

देवदत्तने 52 चेंडूत 101 धावा केल्या. तर विराटने 47 चेंडूत 72 धावा केल्या. राजस्थानच्या गोलंदाजांना ही जोडी फोडण्यात सपशेल अपयश आले. या विजयासह आयपीएल गुणतालिकेत बंगळुरुचा संघ अव्वलस्थानी पोहोचला आहे. बंगळुरुने यापूर्वी पहिल्या सामन्यात मुंबईला, दुसर्‍या सामन्यात हैदराबादला आणि तिसर्‍या सामन्यात कोलकाताला पराभूत केले आहे.

देवदत्त पडिक्कलला राजस्थान विरुद्धच्या सामन्यात सूर गवसला आहे. त्याने आयपीएल स्पर्धेतील त्याचे पहिले शतक झळकावले आहे. यापूर्वीच्या दोन सामन्यात तो झटपट बाद झाला होता. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात 13 चेंडूत 11 धावा करु शकला होता. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर शाहबाज नदीमने त्याला झेल पकडून तंबूत पाठवले होते. कोलकाता विरुद्धच्या सामन्यातही 28 चेंडूत 25 धावा करू शकला. प्रसिध क्रिष्णाच्या गोलंदाजीवर राहुल त्रिपाठीने त्याचा झेल घेतला. त्यामुळे गेल्या दोन सामन्यापासून तो खेळीच्या प्रतीक्षेत होता. अखेर राजस्थान विरुद्धच्या सामन्यात त्याला सूर गवसला आणि त्याने पहिले शतक ठोकले.

राजस्थानचे सुरुवातीला चार गडी झटपट बाद झाल्यानंतर संघ दडपणाखाली आला होता. पाचव्या गडीसाठी शिवम आणि रियान जोडीने राजस्थानचा डाव सावरला. मात्र शिवम दुबे आणि रियान पराग जोडी फोडण्यात हर्षल पटेलला यश आलें. तिथपर्यंत या जोडीने राजस्थानचा डाव सावरला होता. मात्र चुकीचा फटका मारण्याच्या नादात रियान पराग युजर्वेंद्र चहलच्या हाती झेल देऊन बाद झाला.

तर शिवम दुबे केन रिचर्डसनच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या ग्लेन मॅक्सवेलच्या हाती झेल देऊन बाद झाला. शिवमने 32 चेंडूत 46 धावांची खेळी केली. तर रियान पराग 16 चेंडूत 25 धावा करुन बाद झाला. त्यानंतर राहुल तेवतियाने चांगली खेळी केली. त्याने 23 चेंडूत 40 धावांची खेळी केली. याआधी जोस बटलर, मनन वोहरा, डेविड मिलर आणि संजू सॅमसन स्वस्तात तंबूत परतले. मोहम्मद सिराजने चांगली गोलंदाजी करत 4 षटकात 27 धावा देत 3 गडी बाद केले. तर हर्षल पटेलची गोलंदाजी महागडी ठरली. त्याने चार षटकात 47 धावा देत 3 गडी बाद केले. सध्या हर्षल पटेल पर्पल कॅपचा मानकरी आहे. त्याने या सामन्यात 3 गडी बाद केल्याने आता त्याचे एकूण 12 गडी झाले आहेत.

रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. बंगळुरुची या आयपीएल हंगामात चांगली सुरुवात झाली आहे. बंगळुरुने आतापर्यंत एकही सामना गमावला नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com